'अग्निपंख' या आपल्या आत्मचरित्रात डॉ.अब्दुल कलाम यांनी एक प्रसंग वर्णन केलेला आहे. अमेरिकेतील नासाच्या मुख्य सेंटरला ते भेट द्यायला गेलेले असतात त्याच वेळेला वर्जिनीयातील नासाच्या अन्य एका सेंटरला देखील ते भेट द्यायला जातात. आणि त्या सेंटर मध्ये प्रवेश केल्यानंतर स्वागतकक्षाच्या मागे एक युद्धाचे रेखाटलेले चित्र त्यांचे लक्ष वेधून घेते. त्या चित्राकडे थांबून पहाण्याचे कारण म्हणजे त्या चित्रातील युद्धात असलेला क्षेपणास्त्राचा प्रसंग. आणि क्षेपणास्त्र चालवणारे सैनिक 'गोरे' नाही आहेत. 'सावळे' आहेत. पुढे विचारपूस केल्यानंतर त्यांना कळतं, जगातली ही पहिली युद्धाची घटना होती ज्यात भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध करत असताना क्षेपणास्त्राचा प्रयोग केला होता. टिपू सुलतानच्या एका सेनापतीने असे महान कार्य केले होते. बरे झाले. डॉ.अब्दुल कलाम यांनी हा उल्लेख आपल्या आत्मचरित्रात केला. नाही तर हाच उल्लेख अन्य एखाद्या भारतीयानी केला असता तर पुराणातली कथा म्हणून त्यास हिणवण्यात आले असते.
औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली ती केवळ युरोपातून. उर्वरित जग आणि विशेष करून भारत तोपर्यंत अज्ञान अंधकारात जगत होता, असेच आपण मानतो.
यावरही अजून एक वेगळा विचार करुन पाहू की, डॉ.अब्दुल कलाम यांनी वर्णन केलेल्या प्रसंगानंतर किती जणांना आनंद झाला असेल? कितीजणांचा ऊर भरून आला असेल? भारतासाठी ही अभिमानाची आणि गौरवाची घटना आहे असे किती जणांना वाटले असेल?
याउलट प्रत्येकाला आश्चर्य वाटले असेल हे निश्चितच.
अर्थात आपण आत्मविस्मृत तर आहोतच आणि म्हणूनच आत्माभिमानी नाही आहोत. आणि पर्यायाने स्वदेश, स्वभाषा आणि संस्कृतीचा आपल्याला अभिमान नाही आहे. अगदी ठरवून 'अभिमान' हा शब्दप्रयोग केला 'गर्व' नाही. कारण 'अभिमान' हा माणसाचे अधःपतन होऊ देत नाहीत 'गर्व' तसे करतो, म्हणून.
जगात जी औद्योगिक क्रांती झाली त्याच्या अभिनंदनास ते ते देश पात्र आहेतच. पण त्या काळात आपण गहन अंधकारात होतो, असे समजण्याचे कारण नाही. इंग्रज आल्यानंतरच काय ती भारताची प्रगती झाली, असे गोड गैरसमज असलेले आपण सारे भारतीय आहोत. प्रकांडपंडित आणि इंग्रजीवर प्रचंड प्रभुत्व असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार श्री शशी थरूर यांनी ब्रिटन युनियनमधे दिलेले साधारण पाच वर्षां पूर्वीचे संसदीय भाषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजले होते. त्या भाषणात त्यांनी वर्णन केले की, इंग्रज येण्यापूर्वी भारताची अर्थव्यवस्था कशी संपन्न आणि परिपूर्ण होती. याऊलट इंग्रज आल्यानंतर भारताचा जीडीपी कसा घसरला.
परत एकदा बरेच आले, हा संदर्भ देखील काँग्रेसच्या नेत्यांनी दिला म्हणून. असे अजूनही अनेक उदाहरणे सांगता येतील की ज्यातून स्पष्ट होयील आपला इतिहास गौरवशाली आणि अभिमानाचा आहे. पण तथाकथित पुरोगाम्यांना 'आमचे अजून ग्रहण सुटले नाही' या आशयाच्याच सार्या घटना पाहायच्या असतात.
खरं तर जगाच्या पाठीवर असा कोणताही देश नसेल ज्यातील नागरिक व तथाकथित बुद्धिवादी लोक स्व्तःच्याच देशाला सातत्याने एक तर नाव ठेवतात किंवा इतर देशच काय ते प्रगत आहेत, असे गुणगाण गात असतात.
जगातील प्रगत देशांना स्वतःचा इतिहास मांडत असताना इसवी सनाचा आधार घ्यावा लागतो. इसवी सन पूर्व शंभर वर्ष, पाचशे वर्ष, एक हजार वर्ष अशी उलटी कालगणना करून स्वतःच्या अस्तित्वाचे संदर्भ द्यावे लागतात. त्याच ठिकाणी भारतीय कालगणना युगाब्द ५१२१ पासूनची अस्तित्व दर्शवते.
कोणत्याही शास्त्राच्या कलेचा किंवा विज्ञानाच्या खोलात गेलो तरी भारतीयांचे अस्तित्व दिसेलच. हो! पण आजच्या डिजिटल युगात एक तर ते आपण जगासमोर व्यवस्थितपणे मांडू शकलो नाही आहोत किंवा त्याचे पेटंट देखील मिळवू शकलो नाही आहोत. उदाहरणार्थ कडुनिंब. कडुनिंबा सारख्या गोष्टीचे पेटंट पाश्चात्य देशांकडे जाते, या पेक्षा खेदाची बाब ती कोणती? अर्थात हा देखील आत्मविस्मृतीचाच परिणाम आहे. म्हणूनच 'आत्मवृस्मृती' हा भारतीयांना लागलेला सगळ्यात मोठा अभिशाप आहे.
शिवाय स्वातंत्र्यानंतर आपल्यावर लादल्या गेलेल्या मेकॉलेच्या शिक्षणप्रणालीला देखील दोष देऊन चालणार नाही. कारण जशी आत्मविस्मृती प्रगतीला मारक ठरते तसेच इतरांना दोष देऊनही विकास होऊ शकत नाही.
किंवा विशेषत्वाने अधोरेखित करण्याची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या भारतीय परंपरेत सगळेच काही होते. आणि जगात कोणताही शोध लागला तरी देखील प्राचीन भारतीय ज्ञानाचा संबंध आहे असे दाखवतो असे स्तोम माजवणाऱ्या पासून देखिल सावध होणे गरजेचे आहे. कारण आत्मविस्मृती इतकाच अनावश्यक अभिमानही घातक आहे.
थोडक्यात काय तर आपल्या एकंदरीत आजच्या स्थितीला आपली आत्मविस्मृतीच जबाबदार आहे. याचे कारण जर डॉ.बाबासाहेब आंबेडकरंच्या शब्दांत सांगायचे झाले तर, जसे अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो. तसेच 'जाणीव' झालेले अकार्यक्षम लोक अधिक जबाबदार असतात.
म्हणूनच या ठिकाणी जे सुशिक्षित असण्यापेक्षा ही सुजाण आणि सूसंकृत नागरिक आहेत अर्थात आत्मविस्मृत नाही आहेत असे नागरिक, त्यांची जबाबदारी अधिक आहे. आपले जुने सारे विज्ञाननिष्ठ संबंध घेत, त्याचा संदर्भ वर्तमानात लावत उपयोग करता आला पाहिजे. आणि भविष्यातील भारत घडवता येतो याची जाणीव मग आपोआपच येत जाईल. आणि इतरांना आत्मविस्मृतीतून प्रत्यक्ष उदाहरणांमधून बाहेर काढता येईल.
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
6 comments:
कृपया आपले अभिप्राय अवश्य कळवावे
सर आपले लिखाण अतिशय वाचनीय आणि उत्तम भाषा यामुळे बोलताना ,लिहिताना आपली पुरेपूर आठवण म्हणा किंवा संदर्भ घेता येतो,आणि खरंच खूप सूंदर ,धन्यवाद सर
अप्रतिम आणि नेहमीप्रमाणेच वाचनीय..आम्हा पुस्तकप्रेमी रसिकांसाठी रविवारी आपले लेख म्हणजे मेजवानी असते.
हेमंत सर नेहमीप्रमाणे अगदी अभ्यासपूर्ण आणि विचार करायला लावणारा लेख आहे. संदर्भ सुद्धा अगदी मुद्देसूद. खूप खूप धन्यवाद इतकी चांगली माहिती आमच्या पर्यंत पोहचवल्याबद्दल.
अग्निपंख वाचलंय पण हा भारतीय गौरवशाली प्रसंग आपल्या लेखणीतून प्रकाशात आला.
Khup sundar,
Post a Comment