Thursday, 20 June 2019

मनःशांती


मणिकांचनयोग’, दुग्धशर्करायोग’ असा योग त्या दिवशी होता. तो, ती आणि त्याचे आईबाबा नवीन फ्लॅटच्या रजिस्ट्रीसाठी निघायच्या तयारीत होते. तोच तिने सगळ्यांना एकत्र बोलवून ‘गोडबातमी’ सांगितली.

संसाराच्या सात-आठ वर्षात त्या दोघांनी व आई-बाबांनी खूप नवससायास केले होते. त्याचं फळ त्यांना आज मिळालं होतं. आनंद गगनात मावेना असा प्रसंग आजच्या दिवशी सगळ्यांच्याच बाबतीत होता. 
पुढे सगळा दिवस रजिस्ट्री ऑफिस मधील प्रक्रिया पूर्ण करण्यात गेला. 
मोकळा वेळ मिळाला त्या त्या प्रत्येक वेळा प्रत्येक जण नवीन घरात बाळासाठी काय काय करायचं, याचीच चर्चा करत होतं. चौघेही या विचारांनी खूप आनंदून गेले होते. मग घरी आल्यावर गोडधोड करून अगदी आनंदाने सगळ्यांनी दिवस साजरा केला.

जेवणे झाल्यावर त्याचे बाबा म्हणाले, “अरे, आता घर तयार आहे. तर मग आपल्याला ठरवायचे आहे की, कधी आणि कसे राहायला जायचे?”
यावर त्याची आई म्हणाली, “पण आता वास्तुशांती करता येणार नाही. सुनबाई गरोदर आहे ना.”

मग नवीन घरात कसं राहायला जायचं यावर चर्चा सुरू झाली. ती म्हणाली, “आपण फक्त सप्तशतीचे पाठ करूया. माझी खूप दिवसांची इच्छा आहे. आणि आता बाळ येणार, तर एक प्रकारे घरात मंगल विधी होईल”.
त्याने वास्तुशांतीला पूरक म्हणा किंवा तात्पुरता पर्याय म्हणा असा ‘गृहप्रवेशा’चा विधी ऐकला होता म्हणून तो म्हणाला, “किमान नातेवाईकांना बोलावून गृहप्रवेशाचा विधी करूया. वास्तुशांती झाल्यासारखे होईल”.

त्याच्या आईला काही दोन्ही गोष्टी पटल्या नाही. किंबहुना तसे त्यांनी कधी पाहिले नव्हते, ऐकले नव्हते. आणि गृहिणी म्हणून अनेक वर्षांची काटकसर म्हणून त्याची आई म्हणाली, “एवढ्या सगळ्या भानगडी करून अवघडात जाण्यापेक्षा अगदी सुटसुटीत सत्यनारायणाची पूजा करूया”.
त्यावर ती लगेच म्हणाली, “अहो आई, पण पूजेला मलाच बसावे लागेल आणि मग ओटीत नारळ कसा घेता येईल?”
तिचे बरोबर होते, शास्त्रानुसार गरोदर असल्यावर ओटी भरता येत नाही, म्हणून तसे ती म्हणाली.

मग न राहून त्याचे वडील म्हणाले, “एवढ्या वर्षानंतर आपलं घर होते आहे. जे संसाराच्या व्यापात आम्हांला नाही जमलं, ते तुम्ही करत आहात. मग सगळ्या नातेवाईकांना, मित्रांना नको का बोलवायला? थोडं थांबून पण एकदाच वास्तुशांती आणि बाळाचं बारसं एकत्र करूया. तात्पुरती अगदी कुलदेवतेची प्रतिमा नवीन घरी नेऊन ठेवू आणि गृहप्रवेश करूया”.

चौघेही आपापल्या मुद्द्यांवर ठाम होते. प्रत्येक जण आपलाच मुद्दा कसा योग्य आहे आणि परिस्थितीला आणि शास्त्राला धरून आहे, ते सांगत होता. वाद खूप वाढला आणि काहीही निर्णय न होता सगळेजण झोपायला गेले. अर्थातच कोणाचही मन स्थिर नव्हतं.

सकाळ झाली. सगळे उठलेले होतेच. क्वचितच कोणाला झोप लागली असेल. चहाच्या टेबलवर सगळेजण जमले. तिने सगळ्यांसाठी चहा आणला. पण अजूनही कुणी बोलायला तयार नव्हते. फुराक्यांचा आवाज घुमेल एवढी शांतता होती.

मग अनुभवाला कर्तव्याची आणि कर्तृत्वाची जोड असलेले त्याचे वडील अगदी धीरगंभीर आवाजात म्हणाले, “सगळ्यांच सगळंच बरोबर आहे. प्रत्येकाने सांगितलेला विधी, पूजा, उपाय घरच्या भल्यासाठीचा शांतीसाठीचा आहे. मग काय हरकत आहे, माझ्या मनाचं न होता तुमच्या मनाचं झालं तर.
नात्यांमध्ये प्रेमापेक्षा अधिकार गाजवाण्यावर भर दिला की तो सुखसंवाद होत नाही तर केवळ वाद होतो. आणि इथे तर आपण प्रत्येक जण घराच्या शांतीचाच विचार करत आहोत ना. मग ‘शांती’ केवळ एकाच प्रकारे कशी येऊ शकेल?”

एकदम चहा मधलं वादळ शमल्याचा भास सगळ्यांना झाला.

‘आपलंच तेवढं बरोबर आहे’, याची जागा आता, ‘तुम्ही सांगितलेले योग्य आहे तेच करूया’ या वाक्याने घेतली.

पुढे वास्तुशांती झाली, बाळ झालं, बारसंही झालं.
पण तत्पूर्वी सगळ्यांचे मन जुळून ‘मन:शांती’ झाली होती.

©हेमंत पोहनेरकर 
९५९५९६९९८९

1 comment:

Unknown said...

वा!!!अगदीच पूरक!माफक शब्दात ऊत्तम मांडणी

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...