'नाही'.
दोन अक्षरीच शब्द पण मन दुखावणारा. अगदी एखादं वाक्य किंवा उतारा हवा आहे, असेही नाही. मन दु:खी व्हायला 'नाही' हा दोन अक्षरी शब्द पुरेसा आहे.
पण गंमत अशी की, 'नाही' असो वा 'हो' असो, हे दोन्ही शब्दांच उगमस्थान एकच. आणि ते म्हणजे नाभी. अर्थात उत्तर पोटातून दिलेले असते, आणि म्हणूनच की काय, कदाचित त्याचा परिणाम मार्गात येणाऱ्या हृदयावरती होतो.
'नाही' हा मग प्रेमातील असो वा व्यवहारातील मन मोडणे हे पक्कच आहे. अर्थातच उत्तराची प्रतिक्षा करणारा हा नेहमीच आशाळभूत असतो. त्याचे कष्ट वा त्याची इच्छा वा त्याचा काही व्यक्तिगत लाभ ही असू शकतो, पण 'नाही' ऐकताच विषय संपतो.
आणि क्वचित प्रसंगी नवीन विषय पण निघत नाही. कारण 'नाही' ऐकल्यानंतर त्या व्यक्तीबद्दल मनात कुठेतरी आढी निर्माण होते. आपली मागणीच काय ती आपल्याला योग्य वाटत असते. आणि बहुतांशवेळा तिच्या अनुकूल घडावं वाटणे पण स्वाभाविक आहे.
पण बहुदा 'नाही' ऐकणे हे सहन करणे हे वर पाहता अवघड किंवा नकोसे वाटते.
परंतु त्याहीपेक्षा 'नाही' म्हणणे, हे जास्त कठीण आहे. विंदांच्या 'देणाऱ्या आणि घेणाऱ्याच्या' कवितेप्रमाणे आहे. 'नाही' म्हणायला नुसतंच धाडस असावं लागत नाही तर मन नाजूकही असावं लागतं. 'नातं तुटले तर ?' हा विचार मनात येण्यापूर्वी, 'हो' म्हणुन बळजबरीने इच्छा नसताना प्रसंग ओढवून नात्यातील रुक्षता टाळण्याइतकं मन प्रगल्भ असावं लागतं.
हा सगळा केवळ दृष्टिकोनातील फरक नाही तर दूरदृष्टी देखील असावी लागते.
'नाही' म्हणण्याचे परिणाम काही काळापुरते आहेत. पण 'नाही' म्हणायचं असताना 'हो' म्हणाल्यावर जास्त काळ सोसावे लागते. आणि विशेष करून 'नाही' म्हणणार्याला जास्त सहन करावं लागतं.
आणि अनेकवेळा या 'नाही'च्या ऐवजी काही नवे पर्याय शब्द 'नाही' म्हणायचं असणाऱ्याला सापडतात.
आणि ते म्हणजे, 'पहातो', 'सांगतो', 'बघतो'.
थेट 'नाही' म्हणायचं धाडस नसतं. समोरच्याच्या मनाचा अधिक विचार झालेला असतो. किंबहुना नातं नाजूक असतं. 'नाही' म्हणणं नवीन नात्यात वितुष्ट निर्माण करेल, असं वाटत असतं, म्हणून 'नाही' ऐवजी 'सांगतो', 'पाहतो', 'बघतो' म्हटलं की, सुटका झाल्यासारखं वाटतं.
पण खरंतर हे पर्यायी शब्द देवून 'नाही' म्हणायचं टाळणारा अधिक अडकतो. कारण आता समोरचा आश्वासित झाल्यासारखा राहतो. त्या प्रत्यक्ष प्रसंगा पर्यंत त्याची वाट पाहत असतो. थोड्याच वेळात 'सांगतो' म्हणाले होते, ते आता 'हो' म्हणतील. कदाचीत प्रसंग जवळजवळ येत असताना 'सांगतो' म्हणाले होते ते केवळ टाळण्यासाठीच, ही भावना मनामध्ये जागी होते. आणि अशावेळी या 'नाही' न म्हणण्यामूळे मन अधिक दुखावले जाते.
प्रसंग निघून जातो. 'नाही' न म्हणल्याचा कालावधीही लोटतो. आणि दोघांची प्रत्यक्ष भेट होते. आणि 'नाही' न म्हणू शकलेला नमस्कार-चमत्कार करण्यापूर्वीच स्पष्टीकरण द्यायला सुरुवात करतो. की तो का, 'सांगतो', 'पाहतो', 'बघतो', असे म्हणाला होता. आणि कसे त्याला जमले नाही.
आणि या क्षणाला मात्र दोघांनाही माहित असतं की, ही वरवरची मलमपट्टी आहे. दोघेही उसणं हसू तोंडावर घेउन, असं होतच असतं, अशी स्वतःची फसवणूक करून निघून जातात.
'नाही' म्हणण्याचे धाडस परत कधी करू असं, म्हणून प्रसंग निभावून नेला जातो. पण तो पुढचाही 'नाही' म्हणण्याचा प्रसंग कधी येत नाही.
तेव्हा एक गोष्ट स्वीकारायला हवी, जेव्हा
जेव्हा प्रेमात होकार घ्यायचा असतो किंवा द्यायचा असतो, त्या वेळेला 'हो' म्हणून सांगण्यासाठी प्रत्येक वेळेला शब्दांची गरज भासत नाही. 'या हृदयीचे त्या हृदयी', असं प्रेमात शक्य होतं.
तर तेवढ्याच पवित्र, स्वच्छ आणि नि:संकोच मनाने 'नाही' म्हटलं तर स्वीकारले जाईल ना. नाही का?
©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९
2 comments:
Good article.
Mala nahic mhnta yet nahi
Post a Comment