Saturday, 16 May 2020

छंद

'शाळा सुटली, पाटी फुटली' म्हणत शाळेतून घरी परततानांचा आनंद अनुभवलेले दिवस आजही अगदी स्पष्ट आठवतात. विशेषतः शनिवारी दुपारची अर्धी शाळा संपल्यानंतरचा आनंद खूप असायचा. कारण शनिवारचा अर्धा दिवस आणि रविवारचा पूर्ण दिवस केवळ सुट्टी. म्हणजे खेळणे. धमाल-मस्ती करणे. मनसोक्त त्या सुट्टीचा आनंद घेणे. एवढेच सरळ सोपे जीवन असायचे.
आणि हो! 'छंद' म्हणून करावे असे खरंतर त्या वेळी काही माहीत नव्हते. कळत नव्हते किंवा डोळ्यासमोर तसे फारसे कोणाचे उदाहरणही नव्हते.

काळ मागे पडला. वेगाने पुढे सरकला. इतका की ते दिवस इतिहास जमा झाले असे वाटावे. ते खेळणे, ती धमाल-मस्ती, त्या सुट्ट्या सगळेच केवळ आठवणीत राहिले होते.

परंतु निसर्गापुढे सगळेच हतबल. 'न भूतो, न भविष्यती' असा जागतिक महासंकटाचा, महामारीचा सामना करावा लागेल, असे कुणालाही वाटणे अशक्यच. पण तसे झाले. सगळेच 'स्थानबद्ध' झाले. (मी मुद्दामहूनच 'स्थानबद्ध' हा शब्द वापरत आहे. 'संचारबंदी' सारख्या शब्दांनी परत अनुभवायला मिळणारे बालपण कोमेजेले, ही भीती. एवढेच.) पण ते दिवस कदाचीत अनुभवण्याची परत वेळ आली.

आणि आता घरात मुलांसोबत मनसोक्त खेळ, मस्ती, धिंगाणा करत घालायला सुरुवात झाली. मुलांनाही कधी नव्हे ते आई-बाबा एवढा वेळ घरात म्हणजे पर्वणीच होती. खाणे-पिणे, रोज नवीन पदार्थ, भारतीय, परदेशी सगळेच खाऊन मज्जा सुरू झाली. आणि मग घरात जुने बालपणीचे खेळ ही भरपूर खेळलो.

परंतु काही दिवस उलटल्यानंतर वर्तमानपत्र, टीव्ही किंवा आताच्या अमाप सामाजिक प्रसारमाध्यमांतून सगळ्या स्तरावरच्या घरात असलेल्या लोकांनी जोपासलेले छंद प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली.
खरंतर बालपणीची आपल्याला आवडणारी गोष्ट, आपला 'छंद' कदाचित पुढचे शिक्षण आणि त्यानंतर अंगावर पडलेली जबाबदारी यामध्ये कुठेतरी हरवून गेलेला. परंतु बहुतेकांनी तो जोपासला. परत स्वतःला नव्याने अनुभवण्याचा किबहुना स्वतःच बालपण जगण्याचा तो क्षण. कित्येकांनी या क्षणांचं सार्थक केलं. या संधीचं सोनं केलं.

अशी ही कला जोपासणाऱ्या, छंद जगणाऱ्या सगळ्या अभिजात आणि अज्ञात कलाकारांचे अभिनंदनच. परंतु अशा या सगळ्या अज्ञात कलाकारांच्या कलांच्या सादरीकरणाचा अनुभवणारा आजचा हा काळ वेगळा आहे. खरंतर नुसता वेगळा किंवा नवा असता तर ठीक होते.

पण हा काळ स्पर्धेचा आहे.
होय. 'कलेमध्ये स्पर्धा' ही संकल्पनाच, गोष्टच मुळात पूर्णपणे चुकीची आहे. पण ते आजचे दाहक वास्तव आहे. खरंतर जिथे कला नांदते तिथे केवळ निर्भेळ आनंद असतो. आणि जिथे कलेमध्ये स्पर्धेचा शिरकाव व्हायला सुरुवात होते, तिथे स्तुती मिळवण्याचा हव्यास व्हायला सुरुवात होते. परंतु मनुष्य नकळतपणे या सगळ्यामध्ये ओढला जात असतो. इतरांनी केलं की, 'आपल्याला ते यावं', 'आपणही ते करावं', किंवा 'आपणही काहीतरी छंद जोपासू या आणि आपल्या मुलांना ही तसे शिकवू या' असे कुठेतरी वाटायला सुरुवात होते.

पण मी माझ्या बालपणात मागे वळून पाहिले. मी ज्या ठिकाणी वाढलो, त्या ठिकाणी असे चित्रकला, संगीत, नृत्य, दुर्मिळ गोष्टींचा संग्रह करणे इत्यादी असे काहीच नव्हते. मी तसा आठवण्याचा खूप प्रयत्न केला. पण मला काहीच आठवले नाही. आठवत होते ते म्हणजे कुठलीही साधने नसताना सुट्ट्यांमध्ये मित्रांसोबत मनसोक्त आनंदात घालवलेले दिवस. कधीच कंटाळा आला. (नाही, नाही आता तर 'बोअर' असा शब्द वापरायला हवा.) असे बोअर कधी झालेच नाही. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक वेळेस मनसोक्त खेळणे आणि आनंद मिळवणे हाच जणू 'छंद' असायचा.

माझं स्वतःचं बालपण असं असताना मग मी माझ्या मुलांवर ओझं का टाकावं. आणि कला ही तर अभिजात असते ना! मग इतरांची मुले करत आहेत म्हणून मी माझ्या मुलांवर एका अर्थाने अवास्तव ताण तणाव का आणावा. शिक्षणाच्या जगात स्पर्धा आहेच. पण कलेच्या, छंदाच्या जगाला स्पर्धेचे रुप का द्यावे.
आणि मुलांवरही त्याचे ओझे का टाकावे.

मी स्वतः कलाकार कधीच नव्हतो. आणि आता बनणे ही शक्य नाही. सामान्यपणे जीवन जगत असताना सगळ्या अभिजात कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेणे आणि त्यांना मनमुराद दाद देणे, मात्र मला नेहमीच जमत आलेले आहे.
कदाचित तो आनंद मिळवणे हाच माझा छंद असू शकतो!

म्हणूनच मी ठरवले आहे, माझ्या मुलांना कलेसारख्या आनंदाच्या क्षेत्राचा कलाकार बनण्या सोबतच ती कला एक रसिक म्हणूनही अनुभवता येते, निर्भेळ आनंद मिळवता येतो, याचे स्वतः उदाहरण बणून त्यांच्यासमोर ठेवायचे आहे.
म्हणजे त्यांना कलेचे खरे दर्शन होईल.
आणि मग ते ठरवतील की त्यांचा 'छंद' कलाकार होऊन जीवन जगण्याचा आहे की रसिक होऊन...

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

2 comments:

हेमंत पोहनेरकर said...

कृपया आपले अभिप्राय अवश्य लिहावे.

SUDAMA said...

Khup chan ahe,
शाळा सुटली पाटी फुटली आई मला भघ्यने मारलं त्याचे काय बापाचं खाल्लं

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...