Sunday, 3 October 2021

जया अंगी मोठेपणा...

"जया अंगी 'मोठेपणा'...
             ...तया प्रसिद्धी भरपूर".

साधारण दोन वर्षांपूर्वी अभिजीत बिचकुले (सातारा) चे प्रकरण संबंध महाराष्ट्र गाजले. सुरू असलेल्या शोमधून, बिग बॉस मधून त्याला थेट तुरुंगात जावे लागले. आणि प्रकरणीही तसे पहाता अगदी साधे होते- चेक बाऊन्स होण्याचे.
परंतु या सगळ्या प्रकाराणावर सहज दृष्टी टाकली तरी कळून येते,  ती म्हणजे 'कर्तव्यशून्यता'. आणि तरीही हवा हवासा वाटणारा 'मोठेपणा'. कारण एकदा का हा 'मोठेपणा' आला की, त्या मागोमाग 'प्रसिद्धी' अगदी अपोआप येते.

मूळात कर्तुत्व नसेल आणि तरीही नावलौकिक व्हावा असे वाटत असेल, तर 'मोठेपणा'चा मार्ग अगदी सोईचा असतो. मग त्या करिता नको नको ती आश्वासने, नको नको त्या बढाया आणि नको नको  त्या फुशारक्या माराव्या लागतात. कारण विनासायास प्रसिद्धी हवी असते.

पूर्वी ब्रॅण्ड तयार व्हायला वर्षानुवर्षे लागायची. अपार कष्ट, चिकाटी, सचोटी, प्रामाणिकपणा इत्यादी सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिपाक असायचा. तेव्हा कुठे एखादी गोष्ट नावारूपाला येत असे. परंतु आता 'काळ बदलला' असे म्हणणे अगदी स्वाभाविक आहे. खरंतरं 'बदल' ही एकमेव गोष्ट जगत शाश्वत आहे.
म्हणुनच 'मोठेपण'चा 'मोठेपणा' झाला.

आता आधी ब्रँड बनवला जातो. त्याची विश्वासार्हता अक्षरशः पटवली जाते. किंबहुना आपल्याला वेड्यात काढलं जातं.

'आप **** नही जानते?'
'अरे ये **** नही जानते?'
अशा आशयाच्या जाहिरातींमधून आपल्यावर त्या गोष्टीचा भडिमार केला जातो. मार्केटिंगचे हे तंत्र खरंतरं वस्तूंना लागू होते. पण बदत्या जगत आपण ते  जीवनाच्या मंत्राला लावून घेतले आणि यंत्रवत झालो.

वर्तमानाचा डोलारा पेलणारा भूतकाळाचा पाया नाही आहे, म्हणून भविष्य दोलायमान झाले आहे. कदाचित असे भविष्य ज्ञान देखील असते. परंतु प्रसिद्धी या गोंडस आभासी दृश्य खाली अगदी ठरवून गाडले जाते.
म्हणतात ना, 'सुप्रसिद्धी' किंवा 'कुप्रसिद्धी' असे काही मूळी असतच नाही. असते ती केवळ प्रसिद्धी. आणि म्हणून ती प्रसिद्धी मिळवण्याकरिता पाहिजे त्या पद्धतीची नीती, रिती व स्थिती अवलंबिली जाते.

हिंदी मूळाक्षरांमधे आधी 'क' अक्षर येते व नंतर 'ख'. अर्थात हिंदी भाषिक विशेष करुन या गोष्टीचा उल्लेख या करिता करत असतात की, पहिले 'क'माओ फिर 'खा'ओ.

परंतु जिथे सातत्याने चर्चेत राहणे हेच उद्दिष्ट असते, तिथे स्वकष्टाचा आणि स्वकमाईचा मार्गही शॉर्टकटनेच मिळवण्याचा प्रयत्न होतो. आणि तोच 'मोठेपणा'चा मार्ग असतो.

जगद्गुरू संत तुकोबारायांनी 'जया अंगी 'मोठेपण', तया यातना कठीण', असे त्यांच्या अभंगात लिहून ठेवले आहे. सबंध विश्वाला कष्टाची जाणीव तर आहेच पण प्रसंगी कष्ट करून कधी अवहेलना ही सहन करण्याचा प्रसंग ओढवेल, याची जणू पूर्वसूचनाच दिली आहे. आणि बहुदा पूर्वीचा तो आपल्या समाजाचा स्वभावही होता.

परंतु आता सातत्याने 'ट्रेन्डीँग' राहण्याकरिता काही ना काही तरी सुरूच ठेवावे लागेल ना. मग चारचौघात फिरत असताना तसा अभिनिवेष बाळगला जातो. अभ्यासाच्या बैठकीची जागा आता 'मोठेपणा'चा अधिक आभास, या गोष्टीच्या अभ्यासाने अधिक घेतली आहे.  आणि एकदा का मोठेपणाचा हा स्वभाव झाला की तो चित्त स्थिर कसे ठेवू देईल? मोठेपणाला ओढ प्रसिद्धीची असते.
नव्हे मोठेपणाच्या अस्तित्वातच प्रसिद्धी असते. ती दोघे एकत्र नांदत असतात.  म्हणून क्वचित प्रसंगी जर कोणी आपल्याकडे दुर्लक्ष केलं, चारचौघात आपल्याला विचारलं गेलं नाही की,  अक्षरश: होणारा त्रास हा 'जीवन संपले' इतका भयावह असतो.

'मोठेपणा'च्या डोळ्यांवरील आलेल्या झापडांमूळे पूढचे काही दिसत नाही. मग लक्ष वेधून घेण्यासाठी अगदी किळसवाणी वाटावी अशी कृत्ये केली जातात. कारण कुणी विचारलं नाही तर मग पर्यायच नसतो ना. गेले काही दिवस प्रसिद्धीच्या झोतात मध्ये नाही ही भावनाच विषारी आहे.

पु. ल.देशपांडेनी सांगितलेलं 'पोकळी'चं वाक्य आता वाटतं केवळ संग्रहालयात ठेवण्यात योग्य झाले आहे. कारण शब्दाला लागलेला केवळ एक काना अर्थाकडून अनर्थाकडे घेऊन जात आहे. मुंगी होऊन साखर खाण्यात धन्यता मानण्याऐवजी, मोठेपणा मिळवण्यात जास्त सुख मानले जात आहे, हे प्रसिद्धीच्या जगातील दाहक सत्य झाले आहे. या सत्यापासून आपल्याला तुर्तास तरी दूर जाता येणार नाही.
'जया अंगी 'मोठेपणा'...
...तया प्रसिद्धी भरपूर'.


©हेमंत पोहनेरकर
९५९५९६९९८९

10 comments:

हेमंत पोहनेरकर said...

कृपया आपले अभिप्राय अवश्य नोंदवावे

Pratibhajojarekulthe said...

"अपार कष्ट, चिकाटी, सचोटी, प्रामाणिकपणा इत्यादी सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिपाक असायचा" खूप महत्वाचे हे मोठेपण चिरकाल टिकणारे.सध्य परिस्थिती ची वास्तविकता दर्शीविणारा लेख👌👌👌👌👌

Deepak Tamboli said...

छान वास्तववादी लेख

Deepak Blogger said...

Nice

ENCHANTED Spotlight said...

दगडाला टाकेचे घाव सहन केल्याशिवाय देवपण येत नाही...
खूप छान संदेश देणारा लेख आहे.

Unknown said...

कटुसत्य...... वास्तववादी गोष्टींचं विवेचन अगदी साध्या भाषेत.
खूप छान संदेश..... धन्यवाद

हेमंत पोहनेरकर said...

मन:पूर्वक धन्यवाद

हेमंत पोहनेरकर said...

मन:पूर्वक धन्यवाद दीपकजी

हेमंत पोहनेरकर said...

मन:पूर्वक धन्यवाद खेर्डेकर

हेमंत पोहनेरकर said...

मन:पूर्वक धन्यवाद

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...