Sunday, 31 October 2021

चौथी मूलभूत गरज




मनोरंजन.
होय. 'मनोरंजन' ही चौथी मूलभूत गरज आहे. आणि ती देखील अनादिकालापासून. अर्थातच अनादिकालापासून असे असल्यामुळे तिने मानवाच्या विकासाच्या सगळ्या अवस्था पाहिल्या आहेत. या विकासाच्या मार्गात अनेक वर्ष मानवाला तिची अत्यंत गरज होती. अगदी आपल्याला बाल्यावस्थेपासून शिकवलेल्या तीन मूलभूत गरजां इतकीच महत्वाची होती. किंबहुना आहे देखील.

मुळातच मानवाचा विकास, उत्क्रांती पाहत असताना तो जसा भौतिक दृष्ट्या अधिक आधुनिक होत गेला, प्रगत होत गेला हे पाहिले जाते, तसेच सांस्कृतिक, सामाजिक दृष्ट्या देखील त्याची प्रगती पाहिली जाते. परंतु का कुणास ठाऊक, नकळतपणे कदाचित केवळ शासन व्यवस्थेच्या दृष्टिकोनातूनच विचार केला गेला की काय, म्हणून अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत, असेच आजवर मानले गेलेले आहे.

परंतु या तीन गरजां शिवाय जसा माणूस जगू शकत नाही. जशा या गरजा शरीराशी संबंधित आहेत. तसेच जी दिसत नाही त्या मनाशी ही मानवाची एक गरज संबंधित असते तीच मनोरंजन...

आजच्या डिजिटल युगात मनोरंजनाची अनंत साधने आहेत म्हणून की काय ती आजच्या काळात आपल्याला मूलभूत गरज बनलेली आहे, असे मुळीच नाही. तर 'रंजन' हीच मानवाची मूलभूत गरज आहे. केवळ 'पोटभरणे' इथपर्यंतच जीवन असते. तर 'मनभरे' पर्यंत काम करणारी माणसेच निर्माण झाली नसती. खचित पोट नाही भरले तरी मन भरलं की, माणूस सुखी होतो. ही अवस्था असते. अर्थात मनाचा विचार संपूर्ण दिवसात कोणत्याही क्षणाला सोडून देता येत नाही.

हल्ली म्हणून मनोरंजनावर अफाट खर्च होतो, खरंतर हा देखील आपला एक गैरसमज आहे. आपल्या प्राचीन इतिहासावर एक दृष्टिक्षेप टाकला तर लक्षात येईल, आपल्या पूर्वजांची मनोरंजनाची साधने सर्वार्थाने प्रगत होती. म्हणूनच की काय चौसष्ठ कलांचा शोध हा त्यांच्याच काळातील आहे. उलटपक्षी आज आपल्याला कितीजणांना या चौसष्ठ  कला ठावूक आहेत? अर्थातच अत्यंत नगण्य लोकांना. आपल्याला तर त्यांची नावे देखील सांगता येणार नाहीत.

गरज ही शोधाची जननी आहे, या उक्तीप्रमाणे आपल्या पूर्वजांनी मूलभूत गरजां सोबतच मना करीता या चौसष्ठ कलांचा शोध लावलेला आहे, असे लक्षात येते. भजन, किर्तन, प्रवचन, संगीत इत्यादी पासून आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या त्यांच्या प्रवासात चौसष्ठ कलां पर्यंत ते जाऊन पोहोचले.

अर्थातच केवळ उदरनिर्वाहाच्या गरजां इतकेच आपले पूर्वज अडकून राहिले असते तर मात्र 'मनुष्यप्राणी' म्हणून राहिले असते. परंतु त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रसंगी स्वतःची आबाळ करून त्यांनी ती कला जोपासली. अर्थातच त्यांचे जिथे मन रमत होते, ते त्यांनी केले अर्थातच मनोरंजन केले.

मुळात मनोरंजन होत नाही, तिथे मनुष्य राहूच शकत नाही. हल्लीच्या काळात तर मन रमत नाही म्हणून नोकरी व्यवसाय सारं काही खचित वडिलोपार्जित गोष्टी सोडून देखील अन्य गोष्टींकडे गेलेला मनुष्य पाहायला मिळतो. आपल्याला कौतुक वाटते पण ही गोष्ट नवीन नाही, तिचा आधारच 'मन' आहे म्हणून....

अजिंठा, वेरूळ, एलिफंटा अशी कितीतरी लेण्यांमधील कला पाहिल्यानंतर जाणवते, ज्या कलाकारांनी हे महान कार्य केले, त्यांना किती असे मानधन मिळाले असेल? अर्थातच अत्यल्प. किंवा मिळाले असले तरी त्यांचे नाव इतिहासात प्रसिद्ध ही नाही. पण तरीही तीन मूलभूत गरजांचा विचार न करता, चौथ्या गरजेचा अर्थात मनाचा अधिक विचार केला. प्रचंड अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जागतिक  आश्चर्यात गणना करता येईल एवढे महान कार्य त्यांनी केले.

शिवाय पूर्वी राजे-महाराजे त्यांच्या राज्यसभेमध्ये अनेक मंत्र्यांसह भाट देखील असत. अर्थातच एक प्रकारचे भाट  म्हणजे स्तुतिपाठक होते. बहुतांश वेळेला राजाचं मनोरंजन करणे, हेच त्यांचे एकमेव  कार्य असे. आजच्या युगातही महानगरांमध्ये अति श्रीमंतांकडे अशाच प्रकारचे भाट बोलवून कार्यक्रम करण्याची देखील प्रथा आहे. सुट्टीच्या दिवशी हे एक प्रकारचे लाईव्ह मनोरंजनही असते, जे सामान्य माणूसदेखील आता करु लागला आहे.

आणि हो! गरीब ही त्याची मनोरंजनाची साधने शोधतच असतो. केवळ त्यांना आर्थिकतेच्या मापात मोजायला नको. एवढेच. तात्पर्य गरीब असो वा धनिक मनोरंजन हे लागतेच. शिवाय मनुष्य असो वा देव मनोरंजना शिवाय राहू शकत नाही. बघा ना कोणत्याही देवाची प्रतिमा, शस्त्रास्त्रांच्यासह प्रत्येक देवतेच्या हातात कोणते ना कोणते तरी वाद्य आहे....

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

6 comments:

हेमंत पोहनेरकर said...

कृपया आपले अभिप्राय अवश्य कळवावे

Unknown said...

अप्रतिम लेख, मनोरंजन खरंच खूप गरजेचे आहे. म्हणूनच बॉलीवूड / हॉलिवूड प्रचंड पैसा निर्माण करत आहेत. GDP मध्ये मोलाचा वाटा हा मनोरंजन क्षेत्राचा आहेच.

Unknown said...

छान लेखन ........

dr.premkhadkikar@gmail.com said...

प्रगती तथा गतीशील जीवनचक्रामध्ये आज छंद किंवा मनोरंजन याशिवाय इतर उत्तम पर्याय नाहीच
छान विषय .....

Pratibhajojarekulthe said...

मनाला केवळ सतत कामच नको तर कुठे तरी या मानवी मनाचा रंजन झाले पाहिजे म्हणून मनोरंजन ही मानवाची निश्चितपणे गरज आहे रस अन्न, वस्त्र, निवारा आणि याबरोबरच शिक्षण मनोरंजन याही गरज महत्वाच्या

SUDAMA said...

अमच्यकडे भाट यायचे माला थोड़े अथवते,तैना राजाजी म्हणत ,,, घरी अले की युग उग जिये आनंद भरे, ऐसी त्यंची सुरवात असायची..

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...