Sunday, 20 March 2022

व्यवसायांचे नामकरण...

 

संत हे अठरा पगड जातीतील होते. अर्थात समाजाच्या सगळ्याच स्तरांचं प्रतिनिधित्व करणारे संत आजवर होत राहिलेले आहेत. शिवाय याचा अजून एक अर्थ असा, या संतांनी स्वतःची भगवत भक्ती ही स्वतः त्या त्या काळात चालत आलेला पिढीजात व्यवसाय सांभाळत केलेली आहे. म्हणजेच व्यवसाय कोणताही असो, त्याला केवळ उपजीविकेचे एक साधन, एक कर्म मानून आपले मन, आपला विचार हे मात्र भगवंताच्या चरणी अर्पण केलेले आहेत.

आपणही त्याच साऱ्या संतांचे वारसदार आहोत. आपला भाव, आपली भक्ती देखील अनन्यच आहे. पण आपण थोडे अधिक भोळे, अधिक धार्मिक आणि अधिक सहिष्णू आहोत.

अर्थातच व्यवसाय कोणता असावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु त्या व्यवसायाचे 'नाव' काय असावे, ही मात्र सामाजिक जबाबदारी आहे.

खरंतर काही व्यवसाय असे आहेत, ज्यांना व्यक्ती काही केल्या टाळू शकत नाही. जसे की, वैद्यकीय व्यवसाय. डॉक्टरांची उपजीविका ही नागरिकांच्या अनारोग्यावर अवलंबून असते. स्मशानातील कामगारांची उपजीविका ही थेट लोकांच्या मृत्यूशी संबंधित असते. तर स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपजीविका ही लोकांनी बाहेर टाकत असणाऱ्या घाणीशी संबंधित असते.

समाजातील असे अनेक व्यवसाय हे एक प्रकारे समाजाचा समतोल राखण्यासाठीच आहेत. शिवाय कोणाचे तरी हात मलिन झाल्याशिवाय समाजात स्वच्छता निर्माण होणार नाही, हे सत्यच आहे.

म्हणूनच एक समाज म्हणून या सर्व प्रकारच्या व्यवसायातून आपल्याला जावे लागते. आणि आपली उपजीविका पूर्ण करावी लागते.

परंतु असे कितीतरी व्यवसाय करत असताना, अशा अनेक व्यवसायातील उत्पादनांची निर्मिती करत असताना त्यांचे 'नामकरण' आपण खूपच निष्काळजीपणे करतो.

केवळ वानगीदाखल काही नावे पहा - सद्गुरु वाईन शॉप, माऊली चिकन सेंटर, लक्ष्मी बॉम्ब, गाय छाप जर्दा.

जा सद्गुरुंमुळे, ज्या देवीदेवतांमुळे आपल्याला सुख, शांती आणि समृद्धी मिळत असते, त्याच ठिकाणी आपण आपल्या दैवतांचे नाव समाजमान्य नसलेल्या गोष्टींना देतो. परत एकदा ही गोष्ट पक्की आहे की, असे व्यवसाय करावे का नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे.

पण अशाप्रकारचे नामकरण आपल्याच संस्कृतीचे अवमुल्यन करण्यासारखे आहे.

काही वर्षांपूर्वी विदेशातील एका कमोड बनवणाऱ्या कंपनीने आपल्या देवी-देवतांची नावे कमोडवर छापली होती. बातमी कळताच साऱ्या स्तरांतून, संपूर्ण जगभरातून त्याला विरोध झाला. आणि त्या कंपनीला तात्काळ ते उत्पादन पूर्णतः मागे घेऊन, बंद करावे लागले.

अर्थात एकीकडे अशा प्रकारे आपण जागरूकही आहोत. पण स्वतःवर वेळ आल्यावर कदाचित आपण आत्मविस्मृत होतो. आपण आपल्या संस्कृतीविषयी किती माहिती ठेवतो? हा देखील या सर्वातून निर्माण होणारा प्रश्न आहे.
जसे की 'गीता' ही बारा प्रकारांची आहे, हे बहुतांश लोकांना माहीत नाही. श्रीमदभगवतगीता शिवाय अन्य अकरा 'गीता' आहेत.

'व्याध गीता' ही एका पारध्याने सांगितलेली गीता आहे. या 'व्याध गीते'मध्ये उपदेश दिला आहे की, 'कोणतेही कर्तव्य हे कुरूप नसते, अशुद्ध नसते. आणि ज्या मार्गाने हे कार्य केले जाते तेच त्याचे मूल्य निश्चित करत असते.'

म्हणून प्रत्येक कर्तव्य आणि प्रत्येक व्यवसाय हे ज्याच्या-त्याच्या उपजीविकेचे साधन आहे. परंतु त्याचे नामकरण हे संपूर्ण विचारांती व्हायला हवे. याच गोष्टीचा आदर्श आपण जगभरतील अन्य धर्मातून घ्यायला हवा.  कारण जगभरातील अन्य कोणत्याही धर्मातील देवी, देवता किंवा त्यांच्या प्रेषितांचे नाव असे 'त्या' व्यवसायाला दिलेले आपल्याला कुठेही सापडणार नाहीत.

म्हणूनच नव्या पिढीला आपण काय संदेश देणार आहोत? अशा प्रकारे 'नामकरण' केलेल्या नावांचा वारसा आपण देणार आहोत काय?  हा आत्मचिंतनाचा विषय आहे...

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...