'शेवटची तारीख कधी आहे ?', हा सामान्यपणे कोणतीही गोष्ट करत असताना विचारला जाणारा प्रश्न असतो. अगदी शालेय जीवनापासून ते व्यावसायिक जीवनात प्रत्येक काम पूर्ण करताना विचारात घेतली जाते ती शेवटची तारीख.
अर्थात एक ठराविक मर्यादा, कालावधी असल्याशिवाय व्यक्ती म्हणून आपणही ती गोष्ट पूर्ण करू शकणार नाही. प्रत्येक व्यक्तीला तिची योग्यता वा क्षमतेच्या व्यतिरिक्त एक प्रयत्न म्हणून काही कालावधी असावाच लागतो. बहुदा याच कारणास्तव प्रत्येक गोष्ट किंवा व्यावसायिक जगात प्रत्येक काम ठराविक कालमर्यादेत पूर्ण करायचे असते. म्हणूनच ते काम पूर्ण करण्याची एक नेमकी तारीख दिलेली असते. तीच शेवटची तारीख असते. म्हणजे त्या दिवसानंतर ते काम पूर्ण झाल्यास त्याला तत्वतः अर्थ नसतो.
पण याच गोष्टीचा दुसरा अर्थ असा की, आपण शेवटच्या तारखेपर्यंत थांबायचे नसते. शेवटची तारीख हा दिवस म्हणूनच 'डू ऑर डाय' असाच असतो. आणि मुळात शेवटची तारीख येईपर्यंत प्रत्यक्ष आपल्या हातात अनेक दिवस असतात. आणि प्रत्येक काम हे अवघडच असतेच, असे नाही. तात्पर्य प्रत्येक गोष्टीला शेवटच्या तारखेपर्यंत थांबायची आवश्यकता नसते.
अगदी छोट्या-छोट्या स्वरूपाच्या अनेक गोष्टी असतात, ज्या कळाल्यानंतर लगेच पूर्ण करता येत असतात. पण एकंदरीत एक मानसिकता बनवून गेलेली आहे की, 'अजून वेळ आहे. करू काही दिवसांनी'. पण असा विचार करताना त्या शेवटच्या दिवशीची परिस्थिती कशी असेल हे थोडी सांगता येणार आहे. किंवा आपण ती गोष्ट विसरून गेलो तर?
शिवाय आपल्याला सर्व काही येत असताना 'मीच का आधी पूर्ण करायचे?' अशी ही मानसिकता असते. बहुदा या मध्ये आपल्या कामात काही चूक असल्यास परत आपल्याला बोलणे खावे लागेल, ही भावना असते. जेणेकरून आपण कोणाच्या नजरेत भरणार नाही. पण याच उलट बहुतांश वेळा प्रत्येकाचे काम क्षमतेनुसार व्यवस्थित असतेच, पण पहिल्यांदा करण्यात पुढे जाण्याची, प्रगतीची संधी आहे हे मात्र पाहिले जात नाही. करिता शेवटच्या तारखेपर्यंत जरी आपले काम तयार असले तरी ते न देता थांबायचे आणि नेमके शेवटच्या दिवशी जमा करायचे, ही मानसिकता बऱ्यापैकी रुढ झालेली आहे.
एक व्यक्ती म्हणून प्रत्येकात काही ना काही कमतरता असतातच. जर काम पुरेसे आधी पूर्ण करून जमा करायचा प्रयत्न केला तर कदाचित त्या उणिवा प्रकट होतील. ही देखील भीती असते. म्हणून मग आपल्याला जसे येते तसे ते काम पूर्ण करायचे आणि नेमके शेवटच्या दिवशी जमा करायचे म्हणजे मग असलेल्या उणिवा झाकल्या जातात. परंतु या सोबत ही गोष्ट लक्षात येत नाही की प्रगतीची गती देखील मंदावते. आणि असलेल्या उणीवांचे रुपांतर कौशल्यात करण्यास कधीही संधी प्राप्त होत नाही.
मदत, सहकार्य बहुदा हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे. पण तो शेवटच्या तारखे मुळे अक्षरशः मारला जातो.
अर्थात जी गोष्ट आपण अगदी सहजपणे एक ठराविक प्रयत्न, कष्ट करून शेवटच्या तारखेच्या पूर्वीच पूर्ण करत असू तर कदाचित ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. शिवाय ज्यांना ती गोष्ट पूर्ण करण्यास अडचणी येत असतील त्यांच्या करिता ती व्यक्ती एक प्रकारे मदतनीस म्हणून समोर येऊ शकते. आणि साहेबांपर्यंत पोहोचण्या पेक्षा सहकार्यांपर्यंत पोहोचत मदतीची धाव घेणे कधीही सोपे असते. तेच काम ती व्यक्ती शेवटच्या तारखेपर्यंत न थांबता करत असेल तर होऊ शकते. पण इतरांची जबाबदारी नको असा भाव कुठेतरी मनात निर्माण होतो. आणि आपले काम तयार असताना देखील नेमके शेवटच्या तारखेला जमा केले जाते.
या अशा वर्तणुकीमुळे समाजव्यवस्थेचे नुकसान होत असते. शिवाय आपली क्षमता कदाचित नसेल तरी देखील ते शेवटच्या तारखेपर्यंत न थांबल्यास आपल्यातल्या नव्या व्यक्तीची ओळख कधीही होणार नाही. म्हणून 'अजून वेळ आहे करून शेवटच्या तारखेला' या मानसिकतेतून बाहेर नक्कीच यायला हवे....
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

8 comments:
खूप chan
छान
खुप छान.
अप्रतिम हेमंत जी 👌👌
सनी देओल ने *दामिनी* या चित्रपटात *कायद्याच्या* *शेवटच्या* *तारखेच* फार छान वर्णन केलंय
तारीख पे तारीख
तारीख पे तारीख
तारीख पे तारीख
पण मला नेहमीच प्रश्न पडतो कोर्टाच्या निकालाला *शेवटची तारीख* का बर नसते?
बऱ्याच वेळेस सामान्य माणूस शेवटच्या तारखेसाठी धडपडत असतो, पण त्याच्या हातात फक्तं सुरुवात असते, शेवट नसतो.
दुसरी एक मनस्थिती शेवटच्या तारखे बद्दल हीच असते थोडं थांबलं तर एखादी चांगली *डील* मिळेल, अजून एखादा छानसा पर्याय मिळेल, आजुही आपल अस कोणीतरी आपल्या सोबतीला येईल, अजून एकदा सखा आपल्या आयुष्याच्या वाटेवर आपली साथ करेल मग का थांबू नये थोडा वेळ?
शेवटची तारीख नेहमी एक आशा निर्माण करते, की सार काही अजून संपलं नाही... *पिक्चर आभी बाकी है मेरे दोस्त*
खूप छान 👌🏻
एका विद्यार्थ्या साठी तंतोतंत लागू होणारा आहे ब्लॉग
सर्वांचे खूप खूप धन्यवाद....
Post a Comment