Sunday, 26 February 2023

पाल्य, पालक आणि पॅकेज

 



 काळजी हे प्रेमाचे प्रतीक असते.  तर काळजी करूनही न बदलणारी परिस्थिती अस्वस्थतेला जन्म देत असते. कौटुंबिक स्तरावर सर्वजण हा क्रम अनुभवत असतातच. परंतु हीच अवस्थाता जेव्हा सामाजिक स्तरापर्यंत पोहोचते त्यावेळेला निर्माण झालेली सामाजिक अस्वस्थता अधिक घातक असते.

आपण धावत्या डिजिटल युगाचे प्रतिनिधी झालो आहोत म्हणून की काय, नुकत्याच दोन प्रमुख घटना अनुभवायला आल्या, ज्या पाल्य आणि पालक पॅकेज या विषयीच्या आहेत.

नेहमीप्रमाणे कामानिमित्त प्रवासामध्ये होतो. एक विद्यार्थी बसमध्ये शेजारी येऊन बसला. स्वाभाविकपणे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आणि लक्षात आले की, तो अत्यंत कुशाग्र बुद्धीचा आहे.

मग त्याला आवडणाऱ्या तंत्रज्ञान विषयावर तो अधिक बोलला. मी पुढे विचारले, “बहुदा तुला शास्त्रज्ञ व्हायचे आहे, असे वाटते.” लगेच त्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटला.  मान डोलावत तो 'हो' देखील म्हणाला.  मी पुढे म्हणालो, "मग शास्त्रज्ञ होऊन काय करणार आहेस? कशाचा शोध लावणार आहेस?" त्यावर त्याचे अगदी स्पष्ट उत्तर होते, "शास्त्रज्ञांना होऊन मान आणि मोठे पॅकेज मिळवणार."

या क्षणी पहिल्यांदा मन अस्वस्थ झाले. त्या विद्यार्थ्याला मी कुठल्याही प्रकारे काहीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला नाही. मी तसाच विषय टाळून अस्वस्थ मनस्थितीमध्ये विचार करत बसलो. पुढे काही दिवस उलटले. आणि या विषयाची तीव्रता हळूहळू कामांमध्ये विसरतही गेलो. 

परंतु ही अस्वस्थता दुसऱ्यांदा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये उफाळून वर आली. ज्यावेळीला मी एका माझ्या बालमित्राला भेटलो.

अनेक वर्षानंतर भेटल्यामुळे त्याच्यासोबत मन मोकळेपणाने गप्पा झाल्या.  जुन्या आठवणींना उजाळा मिळाला . तो  देखील अत्यंत हुशार असा विद्यार्थी होता आणि आता एका मोठ्या खाजगी कंपनीमध्ये जीएम म्हणून कार्यरत आहे.  सगळ्या गप्पा झाल्यानंतर तो म्हणाला, "पण आता माझे ध्येय आहे मला एक कोटीच्या पॅकेज पाहिजे."  म्हणालो, "आता किती आहे?" त्यावर त्याची उत्तर होते, "खूपच कमी आहे. 50 लाख." माझा पुढचा प्रश्न होता, "मग एक कोटी पॅकेज घेऊन काय करणार. 50 लाखात भागत नाही का?" त्यावर त्याचे उत्तर होते, "जीएम पदाला ते शोभत नाही. किमान एक कोटीच्या पॅकेज तर नक्कीच पाहिजे." 

माझी दुसऱ्यांदा निर्माण झालेली आणि वाढलेली अस्वस्थतता न थांबणारी होती.

एकाच प्रकारचे दोन प्रसंग अनुभवायला आल्यामुळे मूळ मुद्दा लक्षात आला. पालकच मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने पाल्यांसमोर आपल्या पॅकेजचा विचार करतात, चर्चा करतात. आणि स्वाभाविकच आपल्याला मोठे होऊन काय करायचं आहे हे ठरवत असताना, ते का करायचं आहे, तर आपलं ध्येय, स्वप्न साध्य करण्यासाठी नव्हे. तर अधिक पॅकेज मिळवण्यासाठी करायचे, हे नकळतपणे पालकांच्या मार्फतच पाल्यांच्या मनावर कुठेतरी बिंबवल्या जातं. 

म्हणून पहिला प्रसंग घडू नये, असे करायचे असेल तर दुसरा प्रसंगातील उद्दिष्ट निर्भेळ असले पाहिजे.  

मनुष्य हा  नेहमीच अनुकरणातूनच अधिक शिकत जात असतो.  आणि म्हणूनच पालक घरामध्ये ज्या पॅकेजची चर्चा करतात तेच पॅकेज त्यांच्या पाल्यांच्या मनावर कुठे ना कुठेतरी बिंबवल्या जाते. म्हणून नकळतच आपण कुठेतरी एक सदोष अशी समाजव्यवस्था निर्माण करत आहोत. 

स्वप्न, संशोधन, सेवा, कला, क्रीडा, आनंद यासाठी करिअर नाही तर पॅकेजसाठी करिअर हा नवा ट्रेंड रुजू होत आहे. 

खरे तर खाजगी कंपनीत जीएम पदावर काम करणाऱ्या माझ्या मित्राला या गोष्टीची कदाचित जाणीव नाही की, ज्या कंपनीमध्ये तो काम करतो त्या कंपनीमध्ये व्हिजन, मिशन आणि व्हॅल्यूज वर अधिक काम केलं जातं. आणि बहुदा सर्वच खाजगी क्षेत्रांमध्ये या तीन गोष्टी प्रकर्षाने असतात. आणि या सर्व खाजगी कंपन्या मोठं होत असताना त्यांना सामाजिक स्तरावर ते काहीतरी मोलाचं  योगदान करायचं असतं म्हणून त्यांनी त्यांचं व्हिजन ठरवलेलं असतं, त्यांचं मिशन स्टेटमेंट त्यानुसार असतं, आणि त्या व्हॅल्यूजवर मूल्यांवर आधारित ते काम असतात. 

परंतु प्रत्यक्षात जीएम झालेला मित्रा  वैयक्तिक आयुष्यात या व्हॅल्यूजचे अनुकरण करत नाही. म्हणून कदाचित सर्व पालकांना आत्मचिंतनाची गरज आहे की, आपण आपल्या पाल्याला, भावी पिढीला केवळ पैसा निर्माण करणारी मशीन तर करत नाहीयेत ना!

ही सामाजिक अस्वस्थता शिगेला पोहोचू नये एवढीच पालकांकडून अपेक्षा... 


©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

5 comments:

Unknown said...

खूप छान माहिती दिली आहे👌

Sonal G said...

Today's reality.In many cases Parents,teachers as well as society all are directly or indirectly contributing towards such thinking.Morals,values and satisfaction is being sidelined in comparison with fame and money.

हेमंत पोहनेरकर said...

Thanks a lot

Unknown said...

सुंदर👌🏻👌🏻

Anonymous said...

खुप छान 👌👌

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...