घटस्थापनेचा दिवस होता. घरातील सर्व पूजा-अर्चेची तयारी झाली होती.
देवीचे घट बसणार होते. तितक्यात आई म्हणाली, "रात्रीच्या स्वयंपाकातील थोडे अन्न शिल्लक आहे, ते आधी कोणा गरजूला देऊन ये". मी लगेच निघालो. घरापासून अगदीच हाकेच्या अंतरावर देवीचे मंदिर होते, तिथे पोहोचलो.
काहीजण तिथे भिक्षा घेण्यासाठी बसले होतो. मी त्यातील एका आजी जवळ गेलो आणि म्हणालो, "आजी, काल रात्रीची थोडी भाजी-पोळी आहे. तुम्हाला दिली तर चालेल का?"
त्यावर आजी अगदी शांत स्वरात कदाचित मला समजावत म्हणाल्या, “पोरा, नवरात्र सुरू झालेत. मला, नऊ दिवस उपवास असतो मला”.
क्षणभरासाठी मी जागेवर थिजून गेलो. कदाचित एका भ्रमिक कल्पनेत जगत होतो, ‘पोटभरलेलेच लोक उपास-तापास करतात’. परंतु आजींनी माझा भ्रमाचा भोपळा फोडला.
आजींकडे पाहिल्यानंतर जाणवले, हे लोक देवभोळे नक्कीच नाहीत. उलट खरी भक्ती हेच तर अनुभवत आहेत. अन्यथा अंगावर नेसलेले अत्यंत मळकट जीर्ण होत आलेलं लुगड, कोणताही दागिना असायचा तर प्रश्नच नाही, जवळ एखादी मोठी पिशवी वा ततसदृश्य वैभवाचे नाही परंतु किमान सुख समाधानाचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. बहुदा देवाने आठराविश्व दारिद्र पदरात पडले होते.
तरी देखील या गोष्टीचा लवलेशही दिसत नव्हता की, आजी आता देवीकडे खूप काही मागणार आहेत.
किंबहुना देवीचे उपवास करताना देवीकडे आजवर न मिळालेल्या गोष्टींची देखील तक्रार नसणार.
सुकृतदर्शनी माणसाचा चेहरा नेहमीच बोलत असतो. परंतु आजींच्या चेहऱ्यावर निखळ शांतता होती. खंत खचित होती ती केवळ एकच की, आणलेले अन्न घेतले असते, परंतु देवीचा उपवासाला नाही चालणार ना!
संस्कृती,संस्कृती म्हणून उदघोषणा करणाऱ्या, तिच्या संरक्षण,संवर्धन संगोपन करणाऱ्या समाजसुधारकांचे बहुदा देवीच्या दारात नवरात्रीचे उपवास करत प्रत्यक्ष 'संस्कृतीने' सभा थाटली आहे, बहुदा पहिले गेले नसावे.
कुण्याश्या महापुरुषाने सांगून ठेवले आहे, जोपर्यंत सर्वसामान्य माणसांच्या हृदयातील श्रद्धा लोप पावणार नाही, तोपर्यंत आपली संस्कृती अमर आहे.
घरी गेल्यानंतर मला आंघोळ-पांघोळ करून घट बसवायचे होते. देवघराची सारी आरास उभारायची होती, परंतु देवीची प्रत्यक्ष इच्छा काही वेगळीच असणार, ज्या अनुषंगाने प्रत्यक्ष षोडशोपचार, पूजा सुरू करण्याआधी देवीने मला श्रद्धेची प्रचिती दिली होती. अन्न वाया जाणार नाही, या गोष्टीची आता मनात खंत नव्हती. शिवाय अन्य कुणा गरजूला विचारायचे धाडस देखील नव्हते.
आजींना नमस्कार केला. घरी निघालो. देवीचा जागर बहुधा माझ्या मनात सुरू झाला होता.

No comments:
Post a Comment