Sunday, 21 November 2021

पुरस्कारांचे नामकरण

'मृत्यूचा व्यापारी' या शिर्षकाखाली संपादकीय लिहीत असताना, एका फ्रेंच वर्तमानपत्राने वर्णन केले, "माणसांच्या शरीराची चाळण करून त्यांना मृत्युमुखी धाडणारा आता या जगातून कायमचा निघून गेला."

असे स्वतःच्या मृत्यूचे वर्णन वाचण्याचा अत्यंत दूर्दैवी योग आला, ती व्यक्ती होती अल्फ्रेड नोबेल. ज्यांच्या नावे आज जगप्रसिद्ध 'नोबेल पुरस्कार' दिले जातात, ती व्यक्ती. वस्तुस्थितीत 'लुडविग नोबेल' या अल्फ्रेड नोबेल यांच्या भावाचे निधन झाले होते. आणि अशा प्रकारच्या वर्णना मागे कारण होते ते म्हणजे अल्फ्रेड नोबेल यांचे 'डायनामाईट' चे संशोधन.

अल्फ्रेड नोबेल यांना 'मृत्यूचा व्यापारी' या संबोधनाचा प्रचंड धक्का बसला. म्हणून त्यांनी आधीच बनवलेले स्वतःचे मृत्यूपत्र बदलले. आणि स्वतःची केवळ माफक संपत्ती संततीच्या नावे करून उर्वरित अमाप संपत्तीच्या व्याजातून येणारी रक्कम जागतिक स्तरावर कार्य करणाऱ्या आणि तेही मानवजातीचा उद्धार करतील अशा समस्त सशोधकांना देऊ केली.
आज भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यक शास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रात नोबेल पुरस्कार दिले जात असल्याचे आपण पाहतो.

हा पुरस्कार जसा महान आहे. तसेच त्यामागचा कर्ता देखील महान आहे. म्हणून त्याचे नामकरणही महान आहे. एकमेवाद्वितीय असेही अल्फ्रेड नोबेल ने केलेले कार्य आहे.

परंतु आपला भारत देश म्हणून वेगवेगळे दिन, पुरस्कार व योजना आखले जात असतात, तेव्हा त्यांचं नामकरण खरंच एवढ्या खोलवर विचार करून होते का?, हा मूळ प्रश्न आहे.

केवळ दिन, पुरस्कार व योजना हे तर केवळ उदाहरणादाखल दाखल झाले. शाळा, महाविद्यालय, चौक, महामार्ग, नाट्यमंदीर, सामजिक संस्था आदी असे सगळ्यांचेच नामकरण हे केवळ आणि केवळ राजकीय नेत्यांच्याच नावे आजवर झालेली आपण पाहतो.

'प्रेरणा' हा कार्यामागील स्त्रोत म्हणून पहिला तर अशाप्रकारे नामकरण असलेल्या गोष्टींमध्ये प्राण असेल का? गोष्टींमध्ये जिवंतपणा तेंव्हा येतो जेंव्हा त्यां नैसर्गिकपणे निर्माण होत असतात. हीच गोष्ट मग कार्य निर्मितीत ही लागू होते. कार्यरत राहण्याकरिता किंवा कार्याकडे आकर्षित होण्याकरिता त्याची ओढ वाढण्याकरिता ज्या क्षेत्रात आपण जात असतो त्या क्षेत्रातील व्यक्ती सदैव आदर्श म्हणून असेल तर ते कार्य नेहमीच पूर्णत्वास जाते. परंतु भारतात त्याचा विपर्यास पाहायला मिळतो.

नुकताच देशाच्या पहिल्या मा.पंतप्रधानांच्या नावे साजरा होणारा 'बालदिन' होऊन गेला. नेहरूंनी बालांसाठी काय कार्य केले?, मुळात हा प्रश्न असू शकत नाही. बाल कल्याणाकरिता कार्य व्हावे, या संकल्पनेतून प्रत्यक्ष नेहरूंच्या संमतीने हे नाव दिले गेले आहे.
तसेच 'पंतप्रधान आवास योजना',  'पंतप्रधान जनधन योजना' किंवा 'पंतप्रधान कर्मयोगी योजना' हे देखील त्याच श्रेणीतील उदाहरण आहे.

केवळ वानगीदाखल दिन, पुरस्कार व योजना यांचा उल्लेख केला आहे. प्रत्यक्षात अनुभवास येते ते एकच की,  राजकीय व्यक्तींच्याच नावाने नामकरण केले जाते. मग पक्ष कोणताही असो, ती गोष्ट बदलत नाही.

अर्थात मग या सगळ्यावर उपाय काय? खरंतर उपाय तो दिन, तो पुरस्कार आणि ती योजना यातच दडला आहे.


अतिप्राचीन, महान आणि गौरवशाली परंपरा असलेल्या आपल्या या भारतवर्षात कर्मयोग्यांची प्रचंड मोठी संख्या आहे. म्हणूनच ज्या ज्या क्षेत्रात ज्या ज्या व्यक्तीने महान कार्य केले आहे त्यांची त्या त्या क्षेत्रांना नाव देणे, त्यांच्या नावे नामकरण करणे हा केवळ त्या व्यक्तीचाच नव्हे तर त्या कार्यक्षेत्राच्या ही सन्मान आहे.

'स्वच्छ भारत अभियान' हे वस्तुस्थितीच अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांमधे राबवले गेलेले वास्तववादी आणि अत्यंत गरजेचे असे अभियान आहे. परंतु आपल्या देशाचे दुर्दैव असे आहे की, या अभियानाचे नामकरण करता आलेले नाही. 'संत गाडगेबाबा' यांचे नाव 'स्वच्छ भारत अभियाना'ला सार्थ ठरू शकले असते. या निमित्ताने महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून संत गाडगेबाबांचे कार्य सर्व प्रांतात नेता आले असते. परंतु ती गोष्ट करण्याची दृष्टी योजकांमधे नाही.

वस्तूस्थितीत अशी अन्य अन्य क्षेत्रांमध्ये अतुल्य कामगिरी करणारे, या अतुल्य भारतात अगणित आणि अनंत आहेत.  परंतु राजकीय इच्छाशक्ती किंवा दृष्टिकोनाची कमतरता दिसायला लागते. कदाचीत राजकीय स्वार्थ ही असू शकतो.

परंतु असे नामकरण न केल्याने असे जाणवते की, जणू या भारत देशात कर्तृत्ववान, कौशल्यवान, गुणवान, प्रतिभावान व्यक्तींची वाणवा आहे. असे वाटते की, हा देश केवळ राजकारण्यांचाच आहे.

चार वेद, सहा शास्त्र, आठरा पुराण,  बत्तीस विद्या आणि चौसष्ठ कला ज्या भारतवर्षाने जगाला दिल्या, त्या भारताची ओळख आपण येणाऱ्या पिढीसमोर काय म्हणून करणार आहोत?
स्वातंत्र्यानंतरही आपण वेगवेगळ्या क्षेत्रात क्रांतीची परिभाषा करत असतोच, नव्हे तसे कार्यदेखील करत असतो. मग ज्या गोष्टींमुळे ते कार्यक्षेत्र ओळखले जाणार आहे, ज्यामुळे त्या कार्यक्षेत्रामध्ये नवी पिढी आकर्षित होणार आहे, त्या पिढीला आदर्श हा त्या कार्यक्षेत्रातीलच हवा ना. मग तो दिन, तो पुरस्कार आणि ती योजना यांचे नामकरणही त्यानुसारच व्हायला आहे ना...

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

2 comments:

Deepak Tamboli said...

छान विचार करायला लावणारा लेख

Unknown said...

छान लिखाण

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...