"स्वतःसाठी काही करता का?"
एका जेष्ठ व्यक्तीला भेटण्यासाठी गेलो असताना त्यांनी विचारलेला प्रश्न. म्हणालो, "एका खाजगी कंपनीत नोकरी करतो?" त्यावर त्यांचा प्रतिप्रश्न. "नोकरी घरच्यांसाठी, संसारासाठी, स्वतःसाठी काय?"
मी गोंधळात पडलो. माझे चिंताक्रांत मुखकमल पाहून ते म्हणाले, "काही छंद जोपासता का?" तरीही मी आपला स्तब्धच. कारण खरंच संगीत, कला, साहित्य असा विशेष कोणता छंद नव्हता. चित्रपट पाहायला तेवढे आवडायचे. पण तो छंद म्हणून कसा सांगायचे, म्हणून शांतच राहिलो.
त्यावर ते गृहस्थ म्हणाले, "प्रत्येकजण कलाकार नाही असू शकत वा होऊ शकत. पण प्रत्येक जण एक चांगला रसिक नक्कीच होऊ शकतो. आणि त्यातल्या त्यात एक चांगला वाचक होणे ही स्वतःसाठी केलेली अजून एक छान बाब".
खरेच आहे. प्रत्येकजण लेखक नाही होऊ शकत. पण एक उत्तम वाचक मात्र नक्कीच होऊ शकतो. या गोष्टीचा गंभीरपणे विचार करायला लागलो. त्या अनुभवी गृहस्थांमुळे दिशा मिळाली. आणि सोबतच लक्षात आले की, वर्तमानपत्रातील बातम्यांचे वाचन म्हणजे वाचन नाही. उलट त्यामुळे नकारात्मकता पसरते. त्याऐवजी स्तंभलेख, अग्रलेख हे नक्कीच दिशादर्शक. मग हातात पडेल ते वाचायला लागलो. आणि विशेषकरून पुस्तकांवर भर दिला.
मागे कुठेतरी वाचनात आले होते, 'पुस्तक वाचत असताना आपण त्या वाचनासोबत स्वतःचे विश्व तयार करत असतो.' हे वाचल्यानंतर प्रचंड आनंद झाला. आज वरच्या वाचनाकडे मागे वळून पाहिले, खरंच तोच अनुभव होता.
नि मग ठरवले की, दरमहा किमान एक पुस्तक नक्की वाचायचे.
नवोदित, थोरामोठ्या लेखकांची पुस्तके असो किंवा अनेक वेगवेगळ्या विषयांवरची, अनेक क्षेत्रांवरची पुस्तके असो जे हातात मिळेल ते वाचायचे ठरवले. आणि गंमत म्हणजे जसा जसा मी वाचायला लागलो तसतसं माझ्या लक्षात आलं की, अशा प्रकारचे वाचन करणारी अनेक मंडळी आहेत. अगदी नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी सातत्याने प्रवासात असताना लक्षात आलं की, बस आणि रेल्वे मध्ये देखील हातात पुस्तक घेऊन वाचणारे वाचक देखील आजही मोठ्या प्रमाणामध्ये आहेत.
नाहीतरी एका जीवनात असे कितीशे अनुभव आपल्याला येणार? पण तीच गोष्ट अनेकांच्या रूपात स्वतःची संबंधित करून अनुभवायची असेल तर वाचन हेच त्याचे एकमेव उत्तर आहे.
'मनोरंजन' हादेखील महत्त्वाचा भाग आहे. पण रंजनातून शिक्षण व दृष्टिकोन हा नकळत मिळणारा आणि अधिक प्रभावी असा भाग आहे.
चाळिशीत पदार्पण केल्यानंतर एका डॉक्टर मित्रानी सांगितले 'आता किमान रोज चाळीस मिनिट चाला. तर तुझे हृदय अधिक चांगले राहील.'
डॉक्टरांचा सल्ला तो लगेच शिरोधार्य मानला. पण विचार केला, आपले 'विचार' देखील चांगले राहिले पाहिजेत, निरोगी आणि आनंदी राहिले पाहिजेत यासाठी किमान दररोज चार पानं का होईना वाचन नक्की करायचे.
वाचनालयातून, मित्रांकडून मिळेल तिथून पुस्तक मिळवायचे आणि विकत देखील घ्यायची. आज भलेही मराठी पुस्तकांच्या किमती जास्त आहेत. परंतु महिन्याला स्वतःवर दीडशे-दोनशे रुपये आपण नक्कीच खर्च करू शकतो. रोजचा एक कप चहाचाच खर्च समज ना!
वय वाढत जातं. पगारही वाढत जातो. पण सोबतच 'प्रगल्भता' आली का? या प्रश्नाचे उत्तर मिळवायचे असेल तर मग प्रत्येक वेळी नवा दृष्टिकोन हवा. आणि प्रत्येक वेळेला दृष्टीकोण केवळ आपल्याच कल्पनेतून येणार नाही तर त्यासाठी मुबलक प्रमाणात वाचनही हवेच ना!
म्हणूनच 'दरमहा किमान एक पुस्तक वाचन'.
©हेमंत पोहनेरकर

29 comments:
कृपया आपले अभिप्राय अवश्य नोंदवावे
जबरदस्त हेमंतजी
खूपच सुंदर
अप्रतिम हेमंत जी...
छान लिहिलंय हेमंतराव. मी लहानपणी दिवसाला एक पुस्तक वाचून संपवायचो.आता ते शक्य होत नसलं तरी महिन्याला एक पुस्तक सहज वाचलं जातंय
खुप सुंदर
Excellent very nice
रोज एक पान
वाचनाचं महत्त्व खूप छान पद्धतीने पटवून दिलं आहे....
वाचनाने माणूस वैचारिक दृष्ट्या समृद्ध होतो वैचारिक दृष्टीकोन बदलतो
छान
सुंदर👌
मनःपूर्वक धन्यवाद
आपले लिखाण आमच्यासाठी प्रेरणा देऊन जाते... छान!!
Khupach chhan ..... hemant sir
Nice
मनःपूर्वक धन्यवाद,अमोलजी
मनःपूर्वक धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद,मामा
मनःपूर्वक धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद मनोजराव
नक्कीच
मनःपूर्वक धन्यवाद आतिषजी
वाचाल तर वाचाल...
मनःपूर्वक धन्यवाद माधवजी
मनःपूर्वक धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद, यश
खरच ह्या विषयावर खूप काही लिहिण्याची गरज
आपल्या साठी आपण कधी जगतो ?
पैसा आहे पण आरोग्य नाही आणि मानसिक स्वास्थ
तर दुर्मिळ झाले आहे.
खरे आहे.
मनःपूर्वक धन्यवाद....
Post a Comment