'उपवास' आणि 'उपहास' हे शब्द एव्हाना समानार्थी झालेले आहेत की काय असे वाटते. कारण 'उपवास' म्हणजे नवनवीन पदार्थ खण्याच्या पर्वणीचा दिवस, असंच उपवासाचं रसभरीत वर्णन किंबहुना प्रत्यक्ष कृती पाहायला मिळते.
तसेच ‘एकादशी दुप्पट खाशी’ हा निबंध बालपणी कुणी लिहीला नाही, वाचला नाही वा ऐकला नाही असा विद्यार्थी देखील विरळाच. तात्पर्य एकंच की, पालक असो शिक्षक असो वा कुणीही नातेवाईक असो उपवासाला उपहासाच्या परिभाषेतून आजवर व्यक्त करत आलेले पाहायला मिळतात.
आणि असं आपल्याच संस्कृतीचं जरी रूढी बदलत गेली, परंपरा बदलत गेली तसं आपण स्वतःच उपवासाचा उपहास करत आलेलो आहोत.
खरंतर एक व्यक्ती म्हणून आपण आपल्या घरातील गोष्टी चारचौघांत कधीही मांडत नाहीत, जरी त्या चुकीच्या असल्या, त्रासदायक असल्या तरीही. पण शास्त्राधार असलेल्या उपवासाचा मात्र आपण उपहास केला आहे. आणि याकरिता आपणच कारणीभूत आहोत, एक उपासक म्हणून, उपभोक्ता म्हणून.
जगाच्या पाठीवर कुठेही उदाहरण नाही की, आपल्याच संस्कृतीमध्ये असलेल्या गोष्टींचं विडंबनात्मक स्वरूप चारचौघात मांडल्याचे. आहे ते केवळ भारतातच. जुन्या अयोग्य रूढी, परंपरा यांच्यावर प्रहर झालाच पाहिजे. योग्य त्या पद्धतीने आंदोलने झाली पाहिजेत, समाज प्रबोधन झाले पाहिजे. नव्हे तसा आपला इतिहास देखील आहे. पण आपल्या वैभवशाली संस्कृतीचे विडंबनात्मक पद्धतीने मांडणी करून आपण अनवधानाने अवमान आपलाच करतो आहोत, हे आपल्या लक्षात येत नाही.
आणि याहीपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे उपवासाला उपहासाच्या स्वरुपात आपल्या मनावर अगदी बालपणापासूनच बिंबवलं जातं. ‘एकादशी दुप्पट खाशी’, हा विषय अगदी सहज लहानमुलांशी बोलला जातो. नव्हे तशी वर्तवणूकही होते. याउलट आपल्या पाल्याला उपवासाचं महत्त्व पटवून देत नवे उदाहरण प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळत नाही. शिवाय आजवर कुणातरी पालकांनी आक्षेप घ्यायला हवा होता की, ‘एकादशी दुप्पट खाशी’ हा निबंध शालेय अभ्यासक्रमातून काढून टाका म्हणून. पण आपले दुर्दैव असे की, हेच ते पालक आपल्या पाल्याने हा निबंध कसा छान लिहिला आहे, याचा अभिमान बाळगत असतात.
आणि आता तर काय आपण डिजीटल जगात प्रवेश केला आहे. म्हणून पारंपरिक उपवासाच्या ऐवजी ‘इंटरनेटचा उपवास’, ‘मोबाईलचा उपवास’, ‘टी.व्ही.,कॉम्प्युटरचा उपवास' अशा तथाकथित अतिप्रगत, अतिव्यापक, अतिउदार कल्पना मांडल्या जात आहेत.
पण या सगळ्याच्या मुळाशी माणसाचे आरोग्य आहे आणि त्या सोबतच मन आहे. आज आपण सुपर सुपर स्पेशालिटीच्या जगात पोहोचलो असलो तरी सगळेच डॉक्टर मान्य करतात की, गोळ्या औषधांसोबतच योग्य प्रमाणात अन्न रस पोटात गेला की प्रकृतीमध्ये सुधारणा व्हायला अधिक मदत होते.
‘फलं आहारा’चा आपण ‘फराळ’ केला आहे, ‘निरं आहारा’चा आपण निऱ्हाळ केला आहे, म्हणून ही सगळी गडबड आहे.
मी माझी आई आणि आजी यांना अनेक वर्षांपासून पाहत आलो आहे. सोमवार, मंगळवार, शिवरात्र, चतुर्थी, एकादशी या दिवशी या दोघींनी कधीही काहीही खाल्ले नाही. थेट संध्याकाळी उपवास सोडायचा किंवा एकादशी सारख्या दिवशी उपवासाचे काहीतरी खायचे, पण तेही केवळ एक वेळेसंच. परिणाम पाहायला मिळाला तो असा की, आजी वयाच्या ८३ वर्षापर्यंत निरोगी होती. मधुमेह, रक्तदाब, दमा हे आजार तर सोडाच कधी दवाखाना पाहिल्याचेही आठवत नाही. आणि आता आई देखील तशीच ठणठणीत आहे.
सुरुवातीला वाटायचं पूर्वीच्या काळच्या लोकांच्या प्रकृती मुळातच चांगल्या होत्या. त्यांना अन्न देखील शुद्ध खायला मिळाले. पण डॉ.आहसुमी या जपानी शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळालेले वाचनांत आले, तो विषय ऑटोफेगी हा होता. आपल्या संशोधनात डॉ.आहसुमी लिहितात की, ‘जगात सगळ्यात कमी प्रमाणात कर्करोग पाहायला मिळतो तो भारतात, कारण भारतीयांना उपवास करायची सवय आहे’.
असा परकीयांनी संदर्भ दिला की, आपल्याला उपवासाचं महत्व पटायला लागतं. पण वस्तुस्थितीत हे संशोधन देखील भौतिक पातळीपर्यंतच टिकणारे आहे. कारण ते केवळ मानवाच्या शरीर रचनेचा आभ्यास करून झालेले आहे. पण आपल्या धर्मात, शास्त्रात त्याही पुढचा विचार केलेला आहे. कारण मनातील भावना, मस्तिष्कातील विचार यांना देखील अन्न कारणीभूत असतं. आपण ज्या ज्या प्रकारचे अन्न खात असतो, त्या त्या प्रकारचे आपले विचार होत जात असतात. म्हणून सात्विक आहार महत्त्वाचा आहे. तसेच पावसाळ्या सारख्या रोगराईच्या दिवसात, अर्थात चातुर्मासात निर आहार ही महत्त्वाचा. अर्थात म्हणूनच चातुर्मासात अनेकजन आजही केवळ एक वेळ जेवण करतात.
म्हणून मुळातच भारतीय संस्कृती हजारो वर्षांपासून टिकण्याचे हेच कारण आहे की, मानवाचा सर्वांगीण विकासाचा विचार यात पाहायला, अनुभवायला मिळतो. ज्याचे उदाहरण उपवासाच्या माध्यमातून पाहायला मिळते.
म्हणूनच 'उपासका'करिता 'उपवासा'चा मार्ग हा शरीरशुद्धीकरणातून अन्त:करण शुद्धीकरणापर्यंत जाणारा मार्ग आहे...
म्हणूनच 'उपासका'करिता 'उपवासा'चा मार्ग हा शरीरशुद्धीकरणातून अन्त:करण शुद्धीकरणापर्यंत जाणारा मार्ग आहे...
©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९

9 comments:
कृपया आपले अभिप्राय अवश्य नोंदवावे
छान!
छान
नित्याच्या विषयातील विसंगती नेमकेपणाने टिपली आहे.संस्कृतीचा वारसा म्हणून मिळालेल्या विषयांतील निसटणारे निके सत्त्व दाखविणारा हा लेख महत्वपूर्ण वाटला.
छान
धन्यवाद चाचाजी
धन्यवाद गौरशेटे सर
भारतीय संस्कृती आजच्या भाषेत मांडली कि ती तरुण देखील स्वीकारतील, एव्हढाच या लेखामागील उद्देश...
धन्यवाद प्रमोदजी...
मन:पूर्वक धन्यवाद
Post a Comment