Sunday, 2 January 2022

राष्ट्र संकटात नसते तेव्हा...

इतिहासाला काळीमा फासणाऱ्या दोन घटना गेल्या शतकात घडल्या. एक अमेरिकेने जपान शरणागती पत्करत नाही म्हणून दुसर्‍या जागतिक महायुद्धात जपान मधील दोन प्रमुख शहरांवर हिरोशिमा व नागासाकीवर टाकलेला अणूबॉम्ब. आणि दुसरी भारताची फाळणी.


दुर्दैवाने दोन्हीही घटना मानव निर्मीत होत्या. आणि त्यामुळे झालेली राष्ट्रीय क्षती ही अत्यंत भयावह होती. अतोनात मनुष्यहानी झाली. परंतु या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की, या अमानवीय कृती नंतर या राष्ट्रीय संकटानंतर चे राष्ट्र. तर लक्षात येईल की, जपानने ते सारेच चित्र बदलून टाकले आहे. गेल्या काही दशकांपासून जपान आर्थिक महासत्ता आहे. अगदी पहिल्या पाचमध्ये आपले स्थान जपाननी अबाधित ठेवलेले आहे.

म्हणूनच महत्वाची ही गोष्ट आहे की, राष्ट्रीय संकट नसते तेव्हाचे राष्ट्रीय जीवन.

आणि ते उदाहरणांमधून प्रत्यक्ष पहायचे असेल तर जपान हे त्याचे अत्यंत सुंदर आणि परिपूर्ण उदाहरण आहे. त्यामुळे जपान विषयी खूप काही लिहिता येईल. पण मुद्दा हा आहे की, या सगळ्यात एक भारतीय म्हणून आपण कुठे आहोत? 'एक राष्ट्र' म्हणून आपण आहोत का? हा खरा प्रश्न आहे. मुळात 'राष्ट्र' ही भावना आपल्यामध्ये अभावाने आढळते. किंबहुना प्रसंगी आलेल्या राष्ट्रीय जीवनाच्या अपयशाचे उदाहरणही आपल्याला इतिहासात पाहता येईल. आणि ते म्हणजे पानिपतचे तिसरे युद्ध. पानिपतच्या युद्धाच्या पराभवाचे प्रमुख कारण सांगितले जाते, आपण अनेक तुकड्या तुकड्यां मध्ये लढलो. नोंद या गोष्टीची आहे की मराठ्यांच्या छावणीत जाती निहाय चूली पेटत. अर्थात जे मनाने एक नाहीत ते सगळे कोणत्या 'एका' गोष्टीसाठी एकत्र येऊ शकतील? परिणीती साऱ्या जगाने पाहिली आहे.

बहुदा तीच गोष्ट आजही अस्तित्वात आहे. आपण भारतीय तर आहोत पण त्या आधी कोणीतरी अमुक अमुक जातीचे पंथाचे आहोत. 'राष्ट्र प्रथम' म्हणून आपण  सांस्कृतीक दृष्ट्या पूर्वीही होतोच. पण भौगोलिक दृष्ट्या किमान स्वातंत्र्यानंतरची एकता अजूनही प्रासंगिकच आहे.

घटनेने दिलेल्या अधिकारांचा आपण जास्तीत जास्त उपयोग करतो. किंबहुना प्रसार आणि प्रचार ही करतो. परंतु त्याच घटनेने दिलेले 'राष्ट्रीय मूलभूत कर्तव्य' मात्र आपण पूर्णपणे विसरलो आहोत.

मुळात राष्ट्रीय उत्थान आणि पतनाला कोणतेही सरकार हे कधीच कारणीभूत नसते. जबाबदार असतात ते त्या देशातील नागरिक आणि त्यांचे राष्ट्रीय जीवन. खरे तर राष्ट्रीय जीवन किंवा राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना खूप काहीतरी मोठे याठिकाणी अपेक्षितच नाही. नव्हे प्रत्येकाला युद्धावर ही जायचे नाही. परंतु एक गोष्ट महत्त्वाची की, ती कोणतीही गोष्ट करणे  वैयक्तिक जीवनात अपेक्षित नाही ज्याने वैयक्तिक फायदा तर होतो पण राष्ट्रीय नुकसान होते. मग ते अनावधानाने का असेना.

खरे तर लेखाचे शिर्षक 'राष्ट्र संकटात असते तेव्हा' असे असायला हवे होते. परंतु अशा सर्व परिस्थितीत, राष्ट्रीय संकटात आपण कार्य केलेले आहे. आणि त्यात यशस्वी देखील झालेलो आहोत. पासष्ठच्या भारत-चीन युद्धानंतर राष्ट्रीय स्तरावर पडलेल्या अन्नधान्याच्या तुटवड्यानंतर मा. पंतप्रधान श्री लालबहादूर शास्त्रींच्या वक्तव्यनुसार आठवड्यात एक दिवस उपवास करणारे लाखो भारतीय होते. परंतु दुर्दैव असे की, त्याच देशाच्या माननीय पंतप्रधानांना 'स्वच्छ भारत अभियान' ही मोहीम राबवावी लागते. आणि त्यावर करोडो रुपये जनजागृती करता खर्च करावे लागतात.

बहुदा यामागे प्रमुख कारण असावे ते म्हणजे प्रचंड प्रमाणात निर्माण झालेली अनुकूलता. अर्थात सर्वच प्रकारची. आणि अशी सर्व प्रकारची अनुकूलता हीच खरी प्रतिकूलता असते. उदाहरण आपल्याला ठाऊक आहे, बारा वर्षांच्या वनवासात पांडवांनी सगळ्या प्रकारचे युद्ध कौशल्य, ज्ञान आणि सामग्री मिळवली. पण कौरव आत्ममग्न होऊन राहिले. आणि परिणाम सगळ्या जगाने अनुभवला.

त्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, भारत स्वातंत्र्याच्या त्र्याहत्तर वर्षानंतरही 'विकसनशील' न राहता 'विकसित राष्ट्र' व्हावा म्हणून महत्त्वाचे आहे, 'राष्ट्र संकटात नसते तेव्हाचे आपण'...

©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

5 comments:

Virag Pohnerkar said...

छान

Manoj perkar said...

वा फारच छान

ENCHANTED Spotlight said...

The Best ... You have manifested how should be our thought process.

We must keep our National Mood ahead.

Unknown said...

फार सुंदर लेख आहे

Unknown said...

सुंदर लेख

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...