नास्तिकाला ही दैवत असते ते मातेचे. कृतज्ञतेची कृतार्थता प्रकट करण्याचे एकमेव ठिकाण जगाच्या पाठीवर भगवंतानंतर अस्तित्वात आहे ते म्हणजे माता.
वैयक्तिक पातळीवरील माते विषयीची ही जी भावना आहे, तीच पुढे समष्टीपर्यंत जात असताना मातृभूमीविषयी देखील आहे. आणि असा भारतमातेचा इतिहास गौरवशाली, अभिमानास्पद आणि सदैव प्रेरणादायी राहिलेला आहे.
'समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले।
विष्णूपत्नी नमस्तुभ्यम् पदस्पर्श क्षमस्वमे॥'
अशा उच्च भावनेसरशी दिवसाची सुरुवात करणारी भारतीय संस्कृती आहे. की, आपल्याला दिवसभरात पृथ्वीवरून वावरावे लागणार आहे, तरी तिला आपल्या पायाच्या स्पर्शामुळे इजा होणार नाही व अन्य कारणांनी त्रास होणार नाही ना म्हणून आधीच क्षमा मागितली गेली आहे.
ही गोष्ट काही परंपरा, रूढी वा कर्मकांड म्हणून सुरु नाही आहे. तर अगदी वैदिक काळापासून इतिहास पाहिला तरी सर्वत्र एकाच महामंत्राचा उद्घोष पहावयास मिळतो. आणि तो महामंत्र म्हणजे 'वंदे मातरम्'.
ऋग्वेदाच्या सुरुवातीलाच 'माता पृथ्वी महियम्' - ही धरती माझी माता आहे, असे सांगितले गेले आहे.
त्याच गोष्टीचे प्रतिपादन पुढे यजुर्वेद करतो, 'नमो मातरै पृथिव्या' - आम्ही भूमातेला नमस्कार करतो.
एवढेच नव्हे तर अथर्ववेदाच्या शैवक संहितेमध्ये पृथ्वीसूक्त येते. आणि यात वर्णन केले आहे, 'मातृभूमीला चार दिशा आहेत. जिथे शेती केली जाते, प्राण्यांची जी रक्षा करते, ती आमची उदरभरण ही करते, गाईकडून व अन्नातून. आणि हे मातृभूमि, तुझे प्रदेश सदैव रोगविरहित असो. भयापासून दूर असो. इथे सदैव आम्ही जागृत असो. प्राण तळहातावर घेऊन तुझ्यासाठी त्याग करावयास कटिबद्ध असो.'
अशी ज्या ठिकाणी मातृभूमीची स्तुती गायली गेली आहे. त्याच ठिकाणी आशीर्वादही मागितला आहे की, 'आमच्यावर होणाऱ्या आक्रमणांवर विजय मिळवता यावा आणि प्रसंगी प्राणांची आहुती ही द्यावयास आम्ही तत्पर असू'.
याठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, कुठेही असे उल्लेख आढळत नाही की, परकीयांवर आक्रमण करून त्यांचे राज्य वा भूमि मिळावी. आणि असाच संबंध भारताचा इतिहास आहे. भारतावर चाल करून अनेक परकीय आक्रमक आले. पण कधीही कोणत्याही राज्याने असे कृत्य केल्याचे आढळत नाही.
प्रत्यक्षात राम जेव्हा रावणाचा वध करतो. त्याची सोन्याची लंका जिंकतो. परंतु या 'सुवर्ण लंकेला सोडून जायचे का?', या लक्ष्मणाच्या प्रश्नावर उत्तर देतो. -
'अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते।
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी॥'
- 'लंका सोन्याची जरी असली तरी लक्ष्मणा, मला ती आवडत नाही. कारण जन्मदात्री आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा ही श्रेष्ठ असते'.
अर्थात, लंकेचे सौंदर्य, संपन्नता, वैभव इत्यादी सर्व काही असेल. पण जननी व जन्मभूमीची सेवा करण्याचे सौभाग्य जे आहे ते इतर कुठेही नाही.
हीच भावना सबंध भारतवर्षात सर्वच कवींच्या लेखणीतून प्रकट झालेली पहावयास मिळते.
'जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है।
इसके वास्ते ये तन है, मन है और प्राण है॥'
या आशयाचे गीत किंवा,
'तन समर्पित, मन समर्पित और यह जीवन समर्पित।
चाहताहूं मातृभू तुझको अभी कुछ औरभी दुं ॥
'सारं सारं काही दिले तरी हे मातृभूमि, तुला आणखी काहीतरी देण्याची इच्छा आहे.'
आणि म्हणूनच प्रत्येक भारतीय ज्यांनी मातृभूमीच्या, भारतमातेच्या मुक्तीच्या यज्ञात प्राण आहुती दिली, त्यांनी अंतिम क्षणी एकाच गोष्टीची अभिलाषा ठेवली. की, 'हे मातृभूमि माझा जन्म तुझ्याच पदरी होवो. पुन्हा तुझीच सेवा करण्याचे सौभाग्य मला लाभो. आणि असे कैकवार मी तुझ्यासाठी प्राणार्पण करू इच्छितो.'
मातृभूमीची सेवा करत अमरत्व मिळावे आणि अशा मिळालेल्या अमरत्वाचे कवी वर्णन करतो,
'कोर बिलोरी तुझ्या कपाळी, शिरी मोत्यांची माळी गं।
तुझा लोचनी मुक्त आत्म्याची शाश्वत नित्य दिवाळी गं॥
अशा उदात्त आणि जाज्वल्य भावनेचा अविष्कार ठाई ठाई पहावयास मिळतो. याच भावनेचा आणखी एक उल्लेख विष्णू पुराणात आढळतो.
'गायन्ति देवः किल गीत कनि।
धन्यस्तुते भरतभूमी भागे॥'
- 'आम्हा देवतांमध्ये तेच लोक धन्य आहेत, जे भारतभूमीमध्ये उत्पन्न झाले'.
अर्थात, देवांनी देखील याप्रमाणे स्वर्ग आदी ठिकाणी न रमता भारतभूमीत जन्म घेण्यात स्वतःची धन्यता मानली आहे.
श्रीमद भागवतामध्ये देखील ह्याच गोष्टीचा उल्लेख आढळतो की, 'भारतभूमी मध्ये थोड्या वर्षांसाठी जन्म घेतला तरी तो पुण्यवान होतो'. याच भावनेला संत एकनाथांनी शब्दांत व्यक्त केले आहे.
'भारतखंडी नरदेहाची प्राप्ती।
ही तर परम भाग्याची संपत्ती॥'
तसेच याच संतपरंपरेत सर्वच संत जसे की, नरसी मेहता, श्रीमच्छदेव, श्रीदामोदर देव हीच मातृभूमीविषयीची भावना व्यक्त करत असताना पाहावयास मिळतात.
एवढेच नव्हे तर 'बृहत रत्नाकर स्तोत्र'मध्ये भारतभूमातृस्तोत्र हे तेवीस श्लोकांचे स्वतंत्र स्तोत्र पहावयास मिळते. त्याची सुरुवातच 'वंदे मातरमव्यक्तां...' अशी केलीली आहे. नि पुढे त्यामध्ये भारतभूमी मध्ये होऊन गेलेल्या सर्व महापुरुषांचा, सम्राटांचा, ऋषींचा, नद्या व पर्वत यांचा उल्लेख आढळतो. अर्थात या स्तोत्रात मातृभूमीची स्तुतीही आढळते आणि मातृभूमीच्या थोर पुत्रांचे वर्णनही आढळते. आणि शेवटी 'निरंतर भवतुमे...' - आम्ही तुझी निरंतर सेवा करावी.' अशी भावनाही व्यक्त केली गेली आहे.
याच भावनेला घेऊन पुढे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ' वन्देमातरम् सुजलाम् सुफलाम् सश्यशामलाम् मातरम्...'
या क्रांतिकारी गीताला साऱ्या भारतीयांसमोर मांडले. त्या 'वंदे मातरम्'
या मंत्राने विराटरूप धारण केले. देशभक्त क्रांतिकारक ते अबालवृद्धांना पर्यंत सर्वांच्या मुखी एकच उद्घोष होता.
आणि संकटाच्या, कठीण प्रसंगांमध्ये कर्मकांडात न अडकता 'राष्ट्र प्रथम' या भावनेचा अविष्कार प्रकट केला तो कुसुमाग्रजांनी त्यांच्या गीतातून 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्...'
©हेमंत पोहनेरकर
भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९
8 comments:
Khup chan
Virag
वाव फार छान
अंतर्मनाला स्पर्श करणारा लेख...अगदी वस्तुस्थिती आहे ही.
उल्हास देशमुख
न चुकता आपला साप्ताहिक ब्लॉग वाचणारा एक वाचक
खूपच छान. खूप सखोल विवेचन...
अत्यंत अभ्यासपूर्ण,निश्चितच अभिनंदनीय👏👏
भारत माता की जय... अप्रतिम...
जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है।
Khup Chan
Post a Comment