'ग्रीक, युनान, मिस्रा सब मिट गये जहासे, कुछ बात है कि हस्ती मिटती नही हमारी...' या प्रसिद्ध ओळी आपल्याला माहित आहेतच. अर्थात ती 'कुछबात' म्हणजे काही खूप मोठी गुप्त अवस्था किंवा गुपित अशी गोष्ट निश्चितच नाही. भारतीय साधु-संतांनी जगाला दिलेली ती एक वैश्विक देण आहे.
सहिष्णुता, अतिथी देवो भव, वसुधैव कुटुम्बकम, माता भुमी पुत्रोहं पृथिव्या, यासारख्या अनेक जीवनमूल्यंवर आपली संस्कृती टिकून आहे. आणि अर्थातच ही टिकवण्याचं काम पिढ्यान पिढ्या साधु-संतांनी ज्याप्रमाणे केलं. तसंच सामान्य माणसांनी गृहस्थाश्रमाचे पालन करत असताना मोठ्या प्रमाणात ही जीवनमूल्य जपली. म्हणूनच आपली हिंदूसंस्कृती अनादी काळापासून टिकून आहे आणि ती अनादी काळापर्यंत टिकुन राहील, हा देखील विश्वास आहेच.
शिवाय सहिष्णुता म्हणत असताना जगभरात जेंव्हा अन्य देशातील नागरिकांवर अत्याचार आणि अनाचार होत होते. त्यावेळेला भारतानेच जगातील अशा अनेक लोकांना आश्रय दिलेला आहे. येहुदी, पारसी ही त्यातील सगळ्यात मोठी उदाहरणे. केवळ आश्रयच दिला असे नाही तर त्यांना त्यांच्या उपासना पद्धतीचे पालन करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देखील दिले. अर्थात एक हिंदू म्हणून आपण आपले जीवनमूल्यच जपत होतो.
आणि असे यहुदी, पारसी स्वतःचे पंथ संप्रदाय आणि देवी देवतांचे पूजन करत असताना आपल्या संस्कृतीत केव्हा मिसळून गेले हे कळाले देखील नाही. परंतु 'राष्ट्रीय काँग्रेस' आणि 'मुस्लिम लीग'च्या स्थापनेनंतर मात्र एक नवीन संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला गेला. ती संकल्पना म्हणजेच 'मिली-जुली संस्कृती'.
इंग्रजांच्या 'फोडा आणि राज्य करा' या धोरणाचे आपण बळी पडलो. 'मिली-जुली संस्कृती' अर्थात भारत हा एक मिश्र अशा संस्कृतीचा देश आहे, हे आपल्या मनावर बिंबवण्यात आले. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. परंतु त्यांच्या विविधतेत एकता नाही. तर एकतेत वैविध्य आहे. आणि म्हणूनच आजवरच्या हजारो वर्षांच्या आक्रमणामध्ये स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्या देशाला काही वर्षांच्या कालावधीमध्येच 'मिली-जुली संस्कृती' म्हणून संबोधले जाते, ही एक अत्यंत विकृत मांडणी आहे.
खरे तर गंगा उगमापासून सागराला मिळेपर्यंत गंगाच असते. गंगेच्या प्रवाहामध्ये गंगेला अनेक नद्या येऊन मिळतात. भागीरथी, अलकनंदा, यमुना, घागरा, गोमती, शोण या सगळ्या नद्या गंगेच्या मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट होतात. आणि गंगामय होऊन सागराला मिळतात. गंगा ही शेवटपर्यंत गंगाच राहते. तद्वतच हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आहे. वेगवेगळया पूजा उपासना पध्दती असल्या तरी हिंदुस्थानात राहणारे सगळे हिंदूच आहेत. आणि ही हिंदू संस्कृती अशा सर्वांचीच आहे.

4 comments:
👍
Thanks a lot Vivekji
अगदी खरं आहे ...जे मूळ आहेवते मूळ राहणारच ..त्यात भेसळ होऊ शकत नाही कितीही मिली जुली गंगा जमुनी म्हणायचं प्रयत्न केला तरी....मस्त लिखाण झाले आहे
धन्यवाद परागराव.
‘गंगा-जमुना तहजीब’ असे काही असूच शकत नाही.
Post a Comment